फळबाग, विहिरीचे लाभार्थी बिलाची वाट पाहू पाहू थकले,
नरेगा विभागाकडे जिल्हाधिकार्यांनी स्वत: लक्ष घालावे
बीड (रिपोर्टर): बीड पंचायत समिती अतंर्गत फळबाग आणि विहिरीच्या कुशलची बिले मोठ्या प्रमाणात थकलेली आहेत. तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी जिवने आणि सध्याचे गटविकास अधिकारी सानप या दोन अधिकार्यांच्या चुकीमुळे दोनदा कुशलचे आलेले बील परत गेलेले आहेत. शेतकरी कुशलच्या बिलाची रोज वाट पहात असतात, दोनदा आलेली बिले परत गेल्यामुळे शेतकर्यात संताप व्यक्त केला जात आहे. नरेगा विभागाकडे स्वत: जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे आणि शेतकर्यांचे पैसे तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
बीड पंचायत समितीअंतर्गत अनेक शेतकर्यांनी फळबागांची लागवड केली, त्याचबरोबर विहिरीही अनेक शेतकर्यांनी खोदलेल्या आहेत. रोहयोतून ही कामे झाली. काही बिल कुशलच्या माध्यमातून निघतात, फळबाग आणि विहिरींचे बिले ऑनलाईन होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही संबंधित शेतकर्यांच्या खात्यावर बिल जमा झालेले नाहीत. यापूर्वी प्रभारी चार्ज जिवने यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांच्या सहीमुळे आलेले कुशलचे बिल परत गेले. आता पुन्हा 21 तारखेला कुशलचे बील आले होते तेही पंचायत समितीच्या चुकीमुळे परत गेले आहेत. आलेले बील परत जात असेल तर मग हे अधिकारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नरेगा विभागाकडे स्वत: जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, आणि आलेले बीलं परत का जातात? त्याला दोषी कोण? यासह इतर बाबींची चौकशी
करावी आणि शेतकर्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतकर्यांची बिले तत्काळ अदा कसे होतील याकडे लक्ष द्यावे.
ग्रामरोजगार सेवकांचे एक वर्षाचे मानधन थकले
रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरील ग्रामरोजगार सेवकांना रोहयोमार्फत मानधन दिले जाते. त्यांचे मानधन गेल्या एक वर्षापासून थकित राहिलेले आहे, त्यांना मानधन का दिले जात नाही? ग्रामरोजगार सेवकांवर मानधनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे.