मुंबई (रिपोर्टर): विरोधकांचे संख्याबळ कमी असताना शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसच्या आमदारांनी चालू अधिवेशनात शिंदे-फडणवीस-पवार सरकारला चांगलेच घेरल्याचे दिसून येत असून आज विरोधकांनी विधानसभेच्या पायर्यांवर ‘मोदानी से धारावी बचाओ’, अशा घोषणा देत अदानी समुहाला देण्यात आलेल्या धारावी विकास कामाच्या निविदांना विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उद्योजक अदानी यांच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात विरोधकांचे संख्याबळ कमी झाले आहे. गेल्या महिनाभर राष्ट्रवादी नेते अजित पवार हे आपल्या आमदारांसह सरकारमध्ये गेल्यानंतर हे अधिवेशन एकतर्फी होईल, असे वाटत होते, मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात शेतकरी आत्महत्या, शेतकर्यांना मदत जाहीर करण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्यानंतर आता विरोधकांनी राज्यातील इतर मुद्यांवर आक्रमक व्हायला सुरुवात केली आहे. राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावरूनही सभागृहामध्ये आमदार प्रश्न मांडताना दिसून आले आहेत. आज सकाळी विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानसभेच्या पायर्यांवर अदानी समुहाला देण्यात आलेल्या धारावी विकास कामाच्या निविदेला प्रचंड विरोध केला. ‘मोदानी’ से धारावी बचाओ’, अशा घोषणा दिल्या. सदरची घोषणाबाी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात करण्यात आली.