बीड(रिपोर्टर): पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात कुर्हाड घालून खून केल्याप्रकरणी आरोपी अर्जुन महादेव मिटकर (रा.घाटसावळी तांडा ता.जि. बीड) यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल यावलकर यांनी कलम 302 भा.द.वि.प्रमाणे दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व रु. एक हजार दंड व दंड न भरल्यास तीन महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
प्रकरणातील थोडक्यात माहिती अशी की, दि. 12/09/2019 रोजी गणपती विसर्जनाचा उत्सव असल्याने फिर्यादी हा गणपती विसर्जन मिरवणुकीकरिता बाहेर गेलेला होता व गणपती विसर्जन करुन रात्री 10 वा चे सुमारास घरी येत असताना त्याचे वडील आरोपी हा घरासमोरील पिंपळनेर ते घाटसावळी जाणारे डांबरी रोडवर उलट्या करीत असल्याचे दिसल्याने त्यांना कशामुळे उलट्या करीत आहात असे विचारले असता आरोपीने सांगितले की, त्याने विषारी औषध पिले आहे तेंव्हा फिर्यादी व इतर लोकांनी आरोपीस इंडिका कारमध्ये सरकारी दवाखाना बीड येथे नेले तेथे पुन्हा फिर्यादीने आरोपीला तुम्ही औषध का पिलात? असे विचारले असता त्याने सांगितले की, मी तुझ्या आईला डोक्यात कुन्हाड मारुन जिवे ठार मारले आहे त्यानंतर फिर्यादीने घाटसावळी तांडया येथे स्वतःचे घरी जाऊन पाहिले त्यावेळी त्याची आई गवळणबाई अर्जुन मिटकर हि तिचे डोक्यास, गळ्यावर व कपाळावर गंभीर जखमी होवून बाजेवर मयत अवस्थेत पडलेली दिसली व घरामध्ये बाजेच्याजवळ एक लाकडी दांडा असलेली लोखंडी कुन्हाड पडलेली होती व तिचे पात्यास रक्क लागलेले दिसले. त्यावरुन फिर्यादीने दिले वरुन आरोपी अर्जुन महादेव मिटकर यांच्याविरुद्ध कलम 302 भा.द.वि.प्रमाणे पो.स्टे पिंपळनेर येथे गु.र.नं.180 / 2019 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पिंपळनेर पो. स्टे चे सहा. पोलिस निरिक्षक एस. डी. भुतेकर यांनी केला. त्यांनी सदर प्रकरणात तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सदरील प्रकरण नंतर जिल्हा व सत्र न्यायालय, बीड येथे सुनावणीसाठी वर्ग झाले.
सदर प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल.यावलकर साहेब यांच्यासमोर झाली. सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकुण 10 साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात फिर्यादीचा जबाब / इतर साक्षीदारांचे जबाब व इतर परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, न्यायावैद्यकीय प्रयोगशाळा यांचा अहवाल यांचे अवलोकन करुन व जिल्हा सरकारी वकील अॅड. अजय दि. राख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल.यावलकर साहेब यांनी प्रकरणातील आरोपी अर्जुन महादेव मिटकर रा. घाटसावळी तांडा ता. जि. बीड याला भा. द.वी. कलम 302 प्रमाणे दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा व रु. 1000/- चा दंड व दंड न भरल्यास 3 महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणातील फिर्यादी हा मयत व आरोपी यांचा मुलगा आहे. सदर प्रकरणी सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. अजय दि.राख यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पी.एस.आय. जायभाय, ए. एस. आय इंगळे, ए.एस.आय नागमवाड यांनी मदत केली.