Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- कट्टरवादातून देश, समाज उभा राहत नसतो

प्रखर- कट्टरवादातून देश, समाज उभा राहत नसतो

धर्माचा ध्वज,जेव्हा अडाण्यांच्या हाती जातो,तेव्हा त्या ध्वजावरुन रक्ताचे थेंब गळायला लागतात.ते रक्त असते, त्या धर्माचेच!(कुसूमाग्रज) दहशतवादी तालिबान पुन्हा अफगाणिस्थान ताब्यात घेईल असं कधी वाटलं नव्हतं. अमेरिकेने खच खाल्ली, वीस वर्षानंतर अमेरिकेने आपले सैन्य वापस घेतले. त्यामुळे तालीबानला उघड नंगानाच करायला मोकळे रान मिळाले. अफगाणचे तीन ते साडेतीन लाख सैनिक तालीबानसमोर काही करु शकले नाही, त्यामुळे तालीबानला बळ मिळाले आणि तालीबानने सहज अफगाणिस्तान मिळवलं. अफगाणचे सैनिक तालीबानला का विरोध करु शकले नाहीत, या बाबत शंका व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान घणी देश सोडून पळून गेले. जनतेला संकटात टाकून पंतप्रधानांनी पळ काढला. स्वत:चा जीव वाचण्यासाठी घणी पळाले, पण त्यांनी देशाच्या जनतेचा विचार केला नाही. अफगाणचा इतिहास अशा पंतप्रधानांना कधी माफ करेल का? वीस वर्षापासून अफगाणिस्तानची परस्थिती बदलत होती. कट्टरवादी असलेल्या अफगाणमध्ये कमालीचा बदल होत होता. आता पुन्हा जुन्या तालीबान राजवटीची पुनरावृत्ती होणार? लोकशाही नावाची जी गोष्ट असते, ती कधीच अफगाणमध्ये नसणार? जगात लोकशाहीचा पुरस्कार केला जातो. लोकशाही म्हणजे लोकाचं राज्य, लोकांच्या मतांवर चालणारं राज्य, अशा राज्याची स्वप्न कधी अफगाणमधील जनता पाहणार नाही? धर्माच्या आणि जातीच्या आधारावर राज्याचा कारभार करणारे जगात कमी देश नाहीत. प्रत्येक गोष्टीत धर्मकारण आणुन लोकांना वेठीस धरले जाते. लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते. एकीकडे माणुसकीचे धडे गिरवले जातात, तसे संदेश दिले जातात. दुसरीकडे जगातील अनेक देशात अंधाकार,अज्ञान आहे. माणुसकी नावाची जी गोष्ट असते, ती चिरडली जाते. तरी जग ‘अंधळ्याच्या’ भुमिकेत आहे, ही लाज आणणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी बाब आहे.

अनेकांनी भोगलेलं अफगाण वाळवंटी भाग असलेला अफगाण पुर्वीपासून अशांतच राहिलेला आहे. कधी रशिया, कधी इंग्लंडने आपल्या स्वार्थासाठी अफगाणिस्तानच्या भुमीचा वापर केला. सुरुवातीला ग्रीकांनी या ठिकाणी राज्य केलं. नंतर अरब आले. गझनीच्या महंमदानं इथूनच भारत ते इरान एवढ्या मोठ्या प्रदेशावर राज्य केलं. चेंगिस्थानच्या मंगोलांनी अफगाणचा वापर केला. तैमुर हा ही राज्य करुन गेला. बाबर, लोधी, अहमद शहा दुर्राणीसह आदींच्या राजवटी आफगाणिस्तानमध्ये होत्या. शेवटच्या दुर्राणी राजवटीत मोठे मतभेद झाले. त्यावेळी तत्कालीन सत्ताधार्‍यांनी ब्रिटनची मदत घेतली. बाहेरच्या मदतीवर अफगाण जगू लागला. देशात मतभेद नसले तरी ब्रिटन, मात्र मतभेद निर्माण करत होता. त्यामुळे अफगाणमध्ये अशांतता निर्माण होत असे. राजे जहीर शहा यांची राजवट त्यांचा भाचा सरदार महंमद दाऊद याने उलथून लावली आणि आफगाणिस्तान अशांततेच्या कचाट्यात सापडला. १९९२ साली डॉ. नजीबुल्लाह यांची राजवट उलथून टाकण्यात आली. कम्युनिष्ट म्हणवणारे डॉ. नजीबुल्लाह यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह खांबाला लटकवून ठेवण्यात आला होता, हे भयानक कौर्य मुजाहिदींनीनी केले होते. नजीबुल्लाह यांची राजवट संपुष्टात आल्यानंतर अफगाण पुर्णंता उध्दवस्त झाला होता. त्या ठिकाणी छोटे,मोठे सुभेदार तयार झाले. यांच्यात मारामार्‍या होत होत्या. अशा वातावरणात अफगाणची जनता सैरभैर झाली होती.

तालिबानचा उदय नजीबुल्ला यांची सत्ता गेल्यानंतर अफगाफमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ नव्हता. ज्याच्या हातात काठी त्याचीच म्हैस, असाच प्रकार सुरु होता. दोन सुभेदारांनी मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. या सुभेदारांना धडा शिकवण्यासाठी एका टोळीने सुभेदारासह त्याच्या साथीदारांची हत्या केली होती. यामध्ये प्रमुख भुमिकेत होता, मुल्ला ओमर, ओमरने जनतेच्या रक्षणासाठी आपण हे हत्याकांड केल्याचं लोकांना सांगून जनमत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या बोलण्याला लोक काही प्रमाणात भुलले. पुढे त्याने तालिबान नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेत अनेक जण जोडले गेले. धर्म शुध्दीच्या नावाखाली त्याने आपला विस्तार वाढवला. १९९६ ते २००१ या दरम्यान, तालिबानची देशावर सत्ता होती. या सत्तेच्या काळात तालिबाने क्रुरपध्दतीने कारभार करण्यास सुरुवात केली. मुलीच्या शिकण्यावर, महिलांच्या नौकरी करण्यावर बंदी होती. नेलपेट लावल्याबद्दल महिलांची बोटं कापली जायची. फॅन्सी सॅडल घातल्यामुळे महिलांच्या डोक्यात गोळी घातली जायची. ताबिलनाच्या या क्रुरतेला जनता पुर्णंता कंटाळली होती. तालिबान्यांचे हे कृत्य कोणत्याही चौकटीत बसत नव्हते. महिलासाठी अफगाण नरक बनला होता. या नरकातून आपली कधी सुटका होईल की, नाही याचा विचार प्रत्येक अफगाणचा नागरीक करत होता. २००१ साली अमेरिकेवर हल्ला झाल्याने अमेरिका चौताळून उठली आणि अमेरिकेने अफगाणिस्तामधील अतिरेक्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली. अनेक अतिरेकी अमेरिकेने ठार केले. तालिबानचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर अमेरिकेचे सैन्य अफगाणमध्ये तळ ठोकून होते. तेथील व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला. तेथील महिलांना सुरक्षेसाठी प्रशिक्षण दिले. महिला मोकळा श्‍वास घेवू लागल्या होत्या. शाळा, महाविद्यालयात महिलांची संख्या वाढली होती. सर्वत्र महिला दिसून येत होत्या. महिलांची फुटबॉलची टीम होती. अफगाण तालिबान्याने बळकावल्याने पुन्हा महिलांना घरात बंदिस्त व्हावे लागत आहे.

समर्थन कसं करता तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेणं ही फक्त दुर्देवीच बाब नसून जगाची चिंता वाढवणारी आहे. दहशतवादी देश चालवून शकत नाही. दहशतवादी धर्माच्या नावाने लोकांना मारतात, ते ही अगदी क्रूर पध्दतीने, कोणत्याही धर्माने माणुसकीची हत्या करण्याचं सांगितलेलं नाही,हत्या करणं हे पापच आहे. साध्या मुंगीला मारता येत नाही. इथं तर माणसं मारले जात आहेत, धर्माच्या नावाने हत्याकांड घडलं जातं. त्याचं कुणी समर्थन करत असेल तर ‘मारणारा’ आणि त्याचं समर्थन ‘करणारा’ माणुसकीचा दुष्मनचं म्हणावा लागेल. जेव्हा तालिबानने संपुर्ण देश बळकावला. तेव्हा अनेकांनी त्या देशातून पळ काढला. विशेष करुन बड्या लोकांनी, विविध क्षेत्रातील महिलांनी इतर देशात जाणे पसंद केलं. तालिबानच्या विजयाचा काहींना आनंद झाला. चीन, पाकिस्तान, रशिया या देशांनी तालिबानाला समर्थन दिलं. तालिबानला सर्मथन देणं म्हणजे ‘सापाला दुध पाजण्या’ सारखं आहे. जगातील ५६ मुस्लिम राष्ट्रापैकी फक्त पाकिस्तान तालिबानचं समर्थन करतो, पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाला सर्मथन दिलेलं आहे. त्यामुळे या देशात नेहमीच अशांतता असते. भविष्यात पाकिस्तानचा अफगाण झाला तर नवल वाटायला नको. त्या दिशेने त्या देशाची वाटचाल सुरु आहे. भारतातील दोन,चार मुस्लिमांनी तालिबानचं समर्थन केलं,अशांच्या बुध्दीची कीव करावी वाटते. अशांचा अभिनेता नसिरोद्दीन शहा यांनी चांगलाच समाचार घेतला. भारतीय इस्लाम हा जगातल्या इस्लामपेक्षा कायमच वेगळा राहिला आहे, आपल्याला आपल्या धर्मात आधुनिक विचार आणि सुधारणा हव्यात की, कर्मठ धर्मविचार वाढवायचा आहे, असं शहा यांनी म्हटलं असून ते खरं तेच बोलले.

रक्त स्वस्त झालं तालिबान सत्तेवर आला. मंत्रीमंडळ जाहीर करण्यात आलं. यातील अर्धेपेक्षा जास्त मंत्रीमंडळ ‘वॉन्टेड’ आहे. त्यांच्यावर जगातील काही देशांनी इनाम ठेवले होते. तालिबानच्या क्रुरकृत्याची अनेक महिला आपबिती सांगत आहेत. सोशल मीडीयावर अरियाना सईद नावाच्या पॉप सिंगरचा व्हिडिओ समोर आला. तालिबान आपलं अपहरण करतील एखाद्या कमांडरशी जबरदस्तीने लग्न करायला लावतील, कपडे घालण्यावरुन दगडांनी ठेचून मारतील. या भीतीने ती अमेरिकन हवाई दलाच्या विमानात चढली. ती सध्या इस्तबुलमध्ये आहे. अफगाणिस्तानची सर्वप्रथम महिला पायलट निलोफर रहेमानी ही देखील अमेरिकेला पळून गेली. निलोफर पायलट बनल्यापासून तिला दहशतवाद्यांच्या धमक्या येत होत्या. तालिबान समर्थकांनी तिच्या भावाची हत्या केली. अफगाण सरकारसाठी काम करणार्‍या अनेक लोकांना ठार करण्यात आलं. त्यांच्या कुटूंबातील महिलांवर बलात्कार करण्यात येत होते. अशा अनेक घटना घडल्या आणि घडत आहेत. अफगाणचे लोक इतर देशात कोणत्या ना कोण्या कारणावरुन गेलेले आहेत, ते आता अफगाणला जाण्यास तयार नाहीत, कारण त्यांना जगण्याची तितकी गॅरंटी वाटत नाही. कधी काय होईल याची प्रत्येकाला भीती वाटते. महिलांचे संपुर्ण स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आलं. मंत्रीमंडळात एकही महिला नाही. तालीबानने आपले असली दात दाखवायला सुरुवात केली. महिलांनी फक्त मुलांना जन्म द्यावा, त्यांना इतर कुठल्याही क्षेत्रात स्थान मिळणार नाही, असं जाहीर करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानध्ये ‘मारणारा’ आणि ‘मरणारा’ एकाच धर्माचा आहे. अफगाणमध्ये आज पर्यंत नुसता रक्ताचा पाट वाहत आला आणि आज ही वाहत आहे. माणसचं रक्त इतकं स्वस्त झालं का? हा रक्तपात कधी थांबेल, का थांबणारच नाही? अन्याय, अत्याचाराच्या किंकाळ्याने आकाश ही गहीवरुन येत असेल. आधुनिक जगात जास्त रक्तपात हा धर्माच्या नावाने होत आहेे, ही विचार करायला लावणारी बाब आहे, यावर खोलवर चिंतन, मंथन झालं पाहिजे. अडाणी लोकांच्या हाती धर्माचा झेंडा गेल्यावर काय होतं, याचं अफगाणिस्तान हे जिवंत उदाहरण आहे. माणुसकीच्या चिंध्या होत असतांना जग थंड आहे, हे सगळ्यात मोठं दुर्देवं आहे. माणुसकी, आणि न्याय याचा विचार होत नसेल तर जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे, असं मानायला काही हरकत नाही. कट्टरवादातून देश, समाज कधीच उभा राहत नसतो.

Most Popular

error: Content is protected !!