Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमचिखलात गाडी फसली; आजारी महिलेचा उपचाराअभावी गाडीतच तडफडून मृत्यू

चिखलात गाडी फसली; आजारी महिलेचा उपचाराअभावी गाडीतच तडफडून मृत्यू


गेवराई । रिपोर्टर
छातीत दुखू लागल्याने एका 40 वर्षीय महिलेला हॉस्पिटलमध्ये घेवून जात असताना गाडी चिखलात फसल्यानं वेळेवर उपचार न मिळाल्याने गाडीतच महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यात घडली आहे. हा रस्त्याच्या दुरावस्थेचा बळी आहे.


गेवराई तालुक्यातील चकलांबा-चोरपुरी रस्त्यावर काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. आशाबाई उमाजी गंडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. लोकप्रतिनिधींकडून विकास कामांचा दिंडोरा पिटविला जात असतानाच गेवराई तालुक्यातील चकलांबा पासून चार किलोमीटर अंतरावर चोरपुरी हे डोंगरदर्‍यात वसलेले गाव आहे. या गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था बघून तर चोरपुरी येथील ग्रामस्थ दळणवळण कशाप्रकारे करतात हा प्रश्‍न नाही पडला तर नवलच. चारचाकी, दुचाकी सोडाच, परंतु पायी चालणे देखील ग्रामस्थांची कसोटीच असते. गावात कोणी आजारी पडले, महिलांची प्रसुती यावेळी ग्रामस्थांना देवाच्या भरोसे रहावे लागते. स्वातंत्र्याची 75 वर्षे लोटली असताना देखील या गावाला अद्यापही रस्ता झाला नाही, हे मोठे दुर्दैव आहे. सोमवारी या गावातील आशाबाई उमाजी गंडे या अपंग महिलेच्या दुपारी छातीत दुखू लागल्यानं अत्यवस्थ वाटू लागले. त्यामुळे आशाबाई यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन निघाली. मात्र वाटेतच चिखलात ही गाडी फसली. काळी माती त्यात चिखल होते. चालकाने अथक परिश्रम करुन देखील गाडी काही केल्या निघत नव्हती, तर आशाबाई यांना वाटेत रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कुठला पर्याय देखील उपलब्ध नव्हता. दरम्यान वेळेवर उपचार मिळू न शकल्याने आशाबाई यांचा गाडीतच मृत्यू झाला. सायंकाळी या महिलेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विकासाच्या गप्पा मारणारे, निवडणुका जवळ आल्या की, आश्‍वासनांची खैरात करणार्‍या पुढार्‍यांविरोधात संताप व्यक्त होत आहे. तसेच तात्काळ गावाला जोडणारा पक्का रस्ता तयार करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री पालकमंत्री आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी रस्त्याचा प्रश्‍न सोडविला नाही तर आक्रमक आंदोलनाचा इशारा देखील या गावकर्‍यांनी दिला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!