ठाकरे गट अन् संभाजी ब्रिगेडचा मुंबईत
आज मेळावा, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
मुंबई (रिपोर्टर): ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा भव्य मेळावा आज 6 ऑगस्ट रोजी वांद्रे पश्चिम येथील ‘रंगशारदा’ सभागृहात होत आहे. या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्य आणि केंद्रात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे या मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.
राज्यात गतवर्षी झालेल्या सत्ताबदलानंतर मात्र सत्ता परिवर्तनानंतर ठाकरे आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी अनेक पक्ष पुढे सरसावले आहेत. यामध्ये संभाजी ब्रिगेडनेही ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा एकत्र मेळावा होत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. या मेळाव्यासाठी ठाकरे गटाची आणि संभाजी ब्रिगेडची संयुक्त बैठकही शिवसेना भवन येथे पार पडली. या मेळाव्यासाठी शिवसेनेच्या (ठाकरे गट) माध्यमातूनही जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे ठाकरे नेते सुभाष देसाई यांनी सांगितले. नुकतेच झालेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मिळालेला दिलासा आणि राज्यातील घडामोडी यामुळे हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्यासाठी मुंबईच नव्हे, तर राज्याच्या सर्व जिह्यांतून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते-पदाधिकारी मुंबईत येणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात, राजकीय स्थितीवर काय भाष्य करतात आणि सत्ताधार्यांच्या कारभाराचा कसा समाचार घेतात याकडे राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.