पावसाची गरज, पिकांची वाढ खुंटली
जिल्ह्यातील धरणात पाणीसाठा अत्यंत कमी
बीड (रिपोर्टर): मराठवाड्यामध्ये अजूनही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे तलावात पाण्याचा साठा वाढला नाही. काही धरणे कोरडी आहे तर काही धरणांमध्ये दहा ते पंधरा टक्केच पाणीसाठा राहिला आहे. दमदार पावसाची गरज असून पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली. काही शेतकरी आपल्या पिकांना विहिर, बोअरचे पाणी देऊ लागले आहेत. खडकाळ जमीनीतील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली.
जुलै महिन्यामध्ये सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला. मराठवाडा वगळता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश या भागांमध्ये धुव्वाधार पाऊस पडला. या पावसाने त्या परिसरातील धरणांना चांगले पाणी आले. काही धरणे दोन-तीन पावसातच पुर्णत: भरले. मात्र मराठवाड्यात दमदार पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यातील धरणात पाण्याचा साठा 20 ते 25 टक्केच शिल्लक आहे.
बीड जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला नाही. पाण्याअभावी सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर इत्यादी पिकं माना टाकू लागली. कोरडवाडू जमिनीतील पिकं काही प्रमाणात खराब होऊ लागले. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. दिवसभर नुसतं ढगाळ वातावरण आणि सुसाट वारा सुटत आहे. शेतकरी दररोज पावसाची वाट पहात आहे. हवामान खात्याने तर हा महिना कोरडा जाईल, असा अंदाज व्यक्त केलेला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात पाऊस पडला नाही तर मराठवाड्यातील पिकांची मोठी हानी होऊ शकते.