Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडरजनीताई पाटलांची बिनविरोध निवड होणार?

रजनीताई पाटलांची बिनविरोध निवड होणार?

सोमवारपर्यंत उपाध्याय उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता
बीड (रिपोर्टर)- कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा जम्मू-काश्मीरच्या प्रभारी बीडच्या भूमिपुत्री रजनीताई पाटील यांच्या विरोधात भाजपाकडून उपाध्याय यांची उमेदवारी घोषीत करण्यात आली असली तरी ऐनवेळी भाजपा उमेदवार आपली उमेदवारी मागे घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य सभेवर रजनीताई पाटील या बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल कॉंग्रेसच्या नेत्यांची आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेसच्या शिष्टाईला यश आल्याचे बोलले जाते.


कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून समजल्या जाणार्‍या बीडच्या ज्येष्ठ नेत्या तथा जम्मू-काश्मीरच्या प्रभारी रजनीताई पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी कॉंग्रेसकडून विधान परिषदेवर घेण्याचा विचार चालू होता. राज्यपालांकडे जी १२ आमदारांची यादी आहे त्या यादीत रजनीताई पाटील यांचे नाव असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र दुर्दैवाने गेल्या काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांचे निधन झाले. त्यांच्या रिक्त जागेसाठी निवडणूक लागली. या वेळी कॉंग्रेसने पुन्हा एकदा राज्य सभेसाठी रजनीताई पाटील यांना संधी दिली. रजनीताई पाटील यांची उमेदवारी आल्यानंतर भाजपाकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली गेली. मात्र कोरोनाच्या अनुषंगाने आणि अन्य मताच्या गोळा बेरजेत पिछाडीवर असलेल्या भाजपाने या निवडणुकीत म्हणावा तसा रस दाखवला नसल्याचे दिसून येते. त्यात काल नाना पटोलेंसह बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत या निवडणुकीबाबत खल झाल्यानंतर भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय हे आपली उमेदवारी वापस घेण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सोमवारपर्यंत उपाध्याय हे आपली उमेदवारी परत घेतील. त्यामुळे रजनीताई पाटील यांची राज्य सभेवर बिनविरोध निवड होईल. रजनीताई पाटील यांच्या रुपाने बीड जिल्ह्याला लवकरच आणखी एक खासदार मिळणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!