यवतमाळ (रिपोर्टर): केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी संसदेत मारेगाव तालुक्यातील कलावती बांदूरकर या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला घर, वीज, शौचालय, आरोग्य या सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या, असे ठामपणे सांगून राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. या प्रकारानंतर कलावती बांदूरकर यांनी अमित शहा यांचा दावा खोडून काढत आपल्याला राहुल गांधी यांच्यामुळेच सर्व मदत मिळाल्याचे सांगत केंद्र सरकारला खोटे ठरविले.संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी एका कलावती नामक महिलेच्या घरी गेले आणि तिची करुण कहाणी संसदेत सांगितली. हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या कलावतीला मोदी सरकारने वीज, घर, शौचालय, धान्य आणि आरोग्य या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.