गर्भपात करणार्या महिलेसह गोळ्या पुरविणारी महिला आणि तिचा पती अटक
सात दिवसाची पोलीस कोठडी
बीड (रिपोर्टर): बीडपासून जवळच असलेल्या एका खेड्या गावामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. यातून ती गर्भवती राहिली होती. या मुलीचा औरंगाबाद या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात करण्यात आला होता. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चौदा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील दोघा जणांना 9 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान गर्भपात करणारे हे मजूर आहेत. या मजुरांनी आपल्या घरामध्ये मुलीस गोळ्या देऊन तिचा गर्भपात केल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी बीडपासून काही अंतरावर असलेल्या एका गावात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. यातून ती गर्भवती राहिली होती. या मुलीचा औरंगाबाद या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चौदा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील मुख्य आरोपीसह गावातील अन्य एकास पोलिसांनी अटक केलेली आहे. गर्भपात करणार्या लोकांचा पोलीस शोध घेत होते. गर्भपात करणारी महिला सुनिता अनिल सपकाळे (रा. भालगाव फाटा, औरंगाबाद) हिला गेल्या काही दिवसांपूर्वी अटक केल्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी यातीलच स्वाती दत्ता शिंगरे (रा. औरंगाबाद) आणि अनिल उखरुळ सपकाळे या दोघांना अटक केली असून पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, बीड ग्रामीण ठाणेप्रमुख विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय रणखांब, पो.नाईक वरपे, महिला पोलीस दगडखैर यांनी केली आहे. हा तपास पोलीस अधिक्षक ठाकूर यांच्या निर्देशानुसार बीड ग्रामीण पोलिसांकडे देण्यात आला आहे. पूर्वी या प्रकरणाचा तपास पिंक पथकाचे एपीआय अंतरप हे करत होते. दरम्यान गर्भपात करणारे हे मजूर लोक आहेत. या मजुरांनी अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचे समोर आले आहे.