स्वातंत्र्यदिनी उपेक्षित समाज संघटनेचे आ. सोळंके यांच्या घरासमोर धरणे
माजलगाव(रिपोर्टर)ः-येथील तहसिल कार्यालयात श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजने अंतर्गत एक वर्षाध्ये फक्त अकरा प्रस्ताव मंजूर करण्यात आले असुन तालुक्यातील एक ते दिड हजार लाभार्थ्यांचे विहित अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या अर्जदाराचे केवळ सज्ञान मुलगा असल्याचे कारण पुढे करत प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे हे नामंजूर करण्यात आलेले प्रस्ताव मंजूर करून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यावा या मागणीसाठी उपेक्षित समाज संघटनेच्या वतीने आ. प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील लाभार्थ्यांनी संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केलेले आहेत परंतु गरीब, गरजू व पात्र लाभार्थी शासनाच्या अटी व शर्ती पात्र असतांनाही संजय गांधी विभागाकडून लाभार्थ्यांचे केवळ सज्ञान मुलगा असल्याचे कारण तसेच तलाठी अभिप्राय नाही, साक्षीदार स्वाक्षरी नाही, तलाठी अहवाल नाही, रेशन कार्ड सोबत जोडलेले नाही, शिधापत्रिकेची मुळ प्रत मागवा, निराधार असल्याचा पुरावा सादर करा, ऑनलाईन पावतीवर सही नाही यासह छोटे छोटे शुल्लक कारण दाखवून दाखल केलेल्या एक ते दिड हजार प्रस्तावातील फक्त अकरा प्रस्ताव मंजुर करण्यात आले तर उर्वरीत प्रस्ताव तहसिल प्रशासनाने नामंजुर केले आहे. दरम्यान या प्रकरणाकडे लोकप्रतिनिधी असलेले आ. प्रकाश सोळंके यांचे लक्ष वेधण्यासाठी व नामंजुर करण्यात आलेले प्रस्ताव मंजुर करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी उपेक्षित समाज संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक नाडे व लाभार्थ्यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी आ. प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.