परिस्थिती गंभीर, सतर्क रहा, टँकरला मंजुरी द्या, पिक पाहणी सुरू करा
कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातील अधिकार्यांना सुचना
बीड (रिपोर्टर): ऑगस्ट महिना शेवटच्या टप्प्यात आला असतांनाही बीड जिल्ह्यात पाऊस नसल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचना देत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल ध्वजारोहन झाल्यानंतर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकार्यांची बैठक घेत पाणी नियोजनाबरोबर माजलगाव धरण बुडीत क्षेत्रात चारा लागवड नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर टँकर प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्याचे सांगत शेतकर्यांना पिकविमा मिळण्यासाठी पिकांची पाहणी करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल ध्वजारोहन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जि.प.चे मुख्याधिकारी अविनाश पाठक, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, कृषी अधिक्षक काकासाहेब जेजुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी यांच्यासह वेगवेगळ्या विभागांच्या अधिकार्यांसोबत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सध्याच्या दुष्काळी स्थितीवर चर्चा झाली. यावेळी धनंजय मुंडे यांनी खरीपामधील सोयाबिन, बाजरी, मुग, उडीत हातातून गेले आहे, अजून आठ दहा दिवस पाऊस आला नाही तर कापूसही हातचा जाईल अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाने सतर्क रहावे, शेतकर्यांच्या पिकाची पाहणी सुरू करावी म्हणजे त्यांना नुकसानीची भरपाई विम्यामार्फत देता येईल. माजलगाव धरण बुडीत क्षेत्रामध्ये चारा लागवडीचे नियोजन करा, टँकरचा प्रस्ताव आला तर त्याला तात्काळ मंजुरी द्या, विमा कंपनीच्या लोकांकडूनही शेतकर्याच्या पिकाची पाहणी सुरू करा यासह दुष्काळ स्थितीबाबतच्या सुचना धनंजय मुंडेंनी प्रशासनातील अधिकार्यांना दिल्या.
सोबत 17 सप्टेंबर मुक्तीसंग्राम दिनाबाबत आणि बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणी होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत सूचना देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आदी मान्यवर येण्याची दाट शक्यता असल्याने त्या अनुषंगानेही प्रशासनाने तयारी करावी यावरही चर्चा झाली.
कृषी विद्यापीठातील घडामोडींची
माहिती तातडीनं माध्यमांपर्यंत
पोहोचवा, धनंजय मुंडेंच्या सक्त सूचना
कृषी विद्यापीठातील घडामोडीबाबतची माहिती माध्यमांपर्यंत तातडीने पोहोचवण्याची सक्त सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विद्यापीठांना दिली आहे. राज्यातील हवामान बदल, शेतीतील नवनवीन प्रयोग, संशोधन याबाबतची माहिती नियमीत माध्यमांना देण्याबाबत कृषीमंत्री मुंडे यांनी सूचना केली आहे. कृषी विद्यापीठातील सकारात्मक घडामोडींची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचत नसल्यानं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, कृषी विद्यापीठातील घडामोडीबाबतची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहचण्यास विलंब होत आहे. त्यामुळं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. कृषीमंत्री मुंडेंच्या नाराजीनंतर कृषी खात्याकडून परिपत्रक जारी करुन तत्काळ माहिती पोहोचवण्याचे विद्यापीठांना आदेश आले आहेत.