बीड (रिपोर्टर): शहरातल्या भक्ती कन्स्ट्रक्शन भागातील सर्कस ग्राऊंड परिसरात राहणारे विकास डावकर यांच्या घरातील मुलाच्या रुममध्ये शॉर्टसर्किट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागल्याने रुमच्या काचा फुटल्या याक्षणी प्रचंड स्फोट झाला. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी घराकडे धाव घेतली. या आगीत विकास डावकर यांचा 19 वर्षाचा मुलगा प्रसाद डावकर हा दुर्दैवाने मृत्यूमुखी पडला. सदरची हृदयद्रावक घटना आज रविवारी दुपारी 12 वाजता घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र दुर्दैवाने प्रसाद हा या दुर्दैवी घटनेत जळून खाक झाला होता. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड शहरातल्या नगर रोड भागातील गौरी कलर होम या नावाने विकास डावकर यांचे दुकान आहे. ते भक्ती कन्स्ट्रक्शन परिसरातील सर्कस ग्राऊंड परिसरामध्ये राहतात. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे दुकानावर आले तर त्यांच्या घरचे अन्य सदस्य कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरी विकास डावकर यांचा 19 वर्षीय मुलगा प्रसाद विकास डावकर हा एकटा होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रसाद ज्या रुममध्ये होता त्या रुममध्ये स्फोट झाला. तेव्हा परिसरातील नागरीकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
हा स्फोट नेमका कशाचा? यावर चर्चा होत असतानाच घटनास्थळी पोलीस व अग्निशामक दल डेरेदाखल झाले. तेव्हा शॉर्टसर्किट होऊन प्रसाद याच्या रुममध्ये मोठी आग लागल्याचे दिसून आले. ज्या रुमला आग लागली होती ती आग अग्निशामक दलाने विझवली आणि दरवाजा तोडून पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी रुममध्ये प्रवेश केला तेव्हा रुममध्ये असलेल्या प्रसादचा जळून मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे. शॉर्टसर्किटने मोठी आग लागली, मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन रुमच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्या दरम्यान जो आवाज झाला तो स्फोटसदृश्य होता. विकास डावकर हे व्यवसायिक असून त्यांच्या घरी जळीत दुर्घटना होऊन त्यांचा 19 वर्षीय तरणाताठा मुलगा दुर्दैवाने मृत्यूमुखी पडल्याने या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एपीआय गुरले, कप्पे, धारकर यांनी धाव घेतली.