117 महिलांची झाली प्रसुती
बेड कमी पडू लागल्याने जिल्हाधिकार्यांनी घेतली सीएससह अधिकार्यांची बैठक
बीड (रिपोर्टर): 15 ऑगस्टपासून जिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा माफत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारी दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढू लागली. दोन दिवसांमध्ये प्रसुतीसाठी 156 महिला दाखल झाल्या असून 117 महिलांची प्रसुती झाली. यामध्ये 20 महिलांचे सिझर करण्यात आले. वाढती रुग्णांची संख्या पाहता प्रसुती वार्ड कमी पडू लागल्णयाने आज जिल्हाधिकार्यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य सेवा सर्वसामान्य नागरीकांना मोफत मिळाव्यात म्हणून राज्य सरकारने चांगला निर्णय घेतला. 15 ऑगस्टपासून सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी एक रुपयाही लागणार नसल्याची घोषणा सरकारने केल्यानंतर सरकारी दवाखान्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दोन दिवसांमध्ये प्रसुतीसाठी 156 गर्भवती महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. आतापर्यंत 117 महिलांची प्रसुती झाली. 20 महिलांचे सिझर करण्यात आले आहे. वाढती रुग्णांची संख्या पाहता प्रसुती वार्डात जागा कमी पडू लागल्याने त्यावर काय उपाययोजना आखायला हव्यात यासाठी जिल्हाधिकारी मुंडे यांनी वैद्यकीय अधिकार्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीला डॉ. नागेश चव्हाणसह आदींची उपस्थिती होती.
पुढील महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार 200 खाटांच्या इमारतीचे हस्तांतरण
जिल्हा रुग्णालयाच्या बाजुलाच महिलांसाठी 200 खाटांची भव्यदिव्य इमारत बांधण्यात आली आहे. याचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. या इमारतीचे हस्तांतर पुढील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.