आ.लक्ष्मण पवारांकडून
गेवराई पंचायत समितीचे स्टिंग
बीडीओ सहित अनेक अधिकारी, कर्मचारी गैरहजर
सकाळी साडेदहा वाजता दिली अचानक भेट ; मुख्य दरवाजा बंद करून सर्व विभागाच्या हजेरी रजिस्टर ची केली तपासणी
चार विभागाला होते कुलूप ; गैरहजर असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांच्या हालचाल रजिस्टरला कुठलीच नोंद नाही
गेवराई (रिपोर्टर) गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई पंचायत समितीच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी येत असल्याने या तक्रारीची दखल घेऊन आ.पवार यांनी गेल्या दहा दिवसांत तीनवेळा आढावा बैठक घेऊन संबंधित सर्व अधिकार्यांना सूचना दिल्या होत्या. यानंतरही निगरगठ्ठ अधिकारी जुमानत नसल्याने आज सकाळी साडेदहा वाजता थेट पं.स. कार्यालय गाठले व प्रथम सर्व विभागाचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेऊन तपासणी केली. दरम्यान या कार्यालयात पंचायत समिती विभागात फक्त 10 कर्मचारीच उपस्थित होते. तर गटविकास अधिकार्यासह अनेक जण गैरहजर असल्याचे आढळून आले.
गेवराई पं.स. कार्यालयाच्या वारंवार होणार्या तक्रारीची दखल घेऊन आ.पवार यांनी चांगलेच लक्ष घातले असून दर दोन दिवसाला त्यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेत संबंधितांना कार्यालयात बसून नीट कामे करा, नियमात असलेल्या कुठल्याच लाभार्त्यांची अडवणूक करू नका आशा सूचना दिल्या होत्या. परंतु तरीही या विभागातील अनेक अधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने आज दि.22 रोजी सकाळी 10:30 वाजता आ.लक्ष्मण पवार यांनी थेट पंचायत समिती कार्यालयात जाऊन थेट मुख्य दरवाजे बंद करून आतमध्ये सर्व विभागाचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेत स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये मुख्य पं.स. विभागातील एकूण 36 पैकी फक्त 10 कर्मचारी उपस्थित होते. तर या अंतर्गत असलेल्या बालविकास प्रकल्प एक व प्रकल्प दोन या विभागात तीन-तीन पैकी प्रत्येकी दोन, शिक्षण विभागात फक्त दोन, बांधकाम विभागात 18 पैकी फक्त तीन, ग्रामीण पाणीपुरवठा विभागात एकूण पाच पैकी फक्त तीन असे कर्मचारी आढळून आले तर बाकीच्यांनी कुठलीही कार्यालयीन रजा न टाकता दांडी मारल्याचे आढळून आले. तर स्वच्छ भारत, पंचायत, नरेगा आणि घरकुल विभाग या कार्यालयाला 11 पर्यंत कुलूप असल्याचे आढळून आले. दरम्यान या ईतर सर्व विभागाच्या हजेरी रजिस्टरच्या तपासण्या करून त्यावर लाल सहीने टिपणी करत या सर्व रजिस्टर कॉपी ताब्यात घेऊन याचा अहवाल तयार करून वरिष्ठांना देऊन संबंधित अधिकार्यांवर तात्काळ कडक कार्यवाही करणार असल्याचे यावेळी आ.लक्ष्मण पवार यांनी सांगितले.
गैरहजर अधिकार्यांचा अहवाल ग्रामविकास.
मंत्र्यांना देऊन कडक कारवाईची मागणी करणार – आ.पवार
गेवराई पं.स. कार्यालयाच्या कामकाजाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. या तक्रारीची दखल घेऊन मी दि.8 ऑगस्ट रोजी पहिली बैठक घेऊन संबंधित अधिकार्यांना नियमात असतील त्या लाभार्त्यांची अडवणूक न करता सर्व कामे तात्काळ मार्गी लावा आशा सूचना दिल्या, यानंतर मी दर दोन दिवसाला बैठक घेऊन आढावा घेत या सर्वांना वारंवार समज देऊनही अनेकजण कार्यलायच्या वेळेत हजर नसतात, जनतेची कामे वेळेवर करत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज सकाळी मी ठीक साडेदहा वाजता या कार्यालयाचे स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरवले त्यानुसार पंचायत समिती कार्यालयाची कामकाजाची वेळ सकाळी 9:45 ची असताना मी साडेदहा ला कार्यालयात आलो तेव्हा कार्यालयीन प्रमुख गटविकास अधिकारी व यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळुन आले तर अंतर्गत असलेल्या चार विभागाच्या दालनाला अकरा पर्यंत कुलुप असल्याचे दिसून आले. मात्र याबाबत मी सर्व विभागाच्या रजिस्टर नोंदी तपासून याबाबत एक अहवाल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्याकडे सादर करून संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळी 11 पर्यंत चार विभागाला कुलूपच
आ.लक्ष्मण पवार यांनी सकाळी बरोबर साडेदहा वाजता कार्यालयात प्रवेश केल्यानंतर आतमध्ये जाऊन जवळपास अर्धातास सर्व विभागाचा आढावा घेतला मात्र यातील स्वच्छ भारत मिशन, नरेगा, पंचायत विभाग व घरकुल विभाग या चार कार्यालयाचे तर कुलुपही उघडलेले नव्हते. याची नोंद घेऊन या संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.