बीड (रिपोर्टर): येत्या सप्टेंबर महिन्यात 16 तारखेच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यामध्ये येण्याची ताट शक्यता असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असून बीड जिल्ह्यातील विकास कामाचे प्रस्ताव, झालेल्या कामाचे उद्घाटन, प्रलंबीत प्रस्ताव यासाठी आज जिल्हाधिकार्यांनी खातेप्रमुखांची बैठक घेऊन सर्व खातेप्रमुखांना सूचना देत कामकाजाचा आढावा घेतला.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्या अनुषंगाने विकास योजनांचे पंच्याहत्तर हजार लाभार्थी जिल्ह्यातून निवडायचे आहेत. सोबतच अनेक योजना सामान्यांपर्यंत पोहचवायचे आहेत.
बीड जिल्ह्यातील विकास कामांचे काही प्रस्ताव मंत्रालयस्तरावर प्रलंबीत आहेत. काही योजनांतून विकास कामे झाले आहेत. लाभार्थ्यांना निधी वाटपाचे धनादेश वितरीत करावयाचे आहेत. या सर्व बाबींसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तब्बल चार तास खातेप्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्या विभागाकडील झालेले कामे आणि प्रलंबीत प्रस्ताव याबाबत सविस्तर माहित घेऊन लेखी संचीका तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत. कोणत्या कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या हस्ते करावयाचे आहेत आणि कोणत्या विकास कामांचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबीत आहेत याबाबतची माहिती मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी खातेप्रमुखांना सूचना करत त्यांच्याकडून लेखी प्रस्ताव मागवून घेतले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, सर्व विभागाचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.