बीड जिल्ह्याचा दुष्काळ मिटवणे आहे
उत्तरदायित्व सभेचे काऊंटडाऊन सुरू
अजितदादांसह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या स्वागताला बीड नगरी नटली
भव्यदिव्य कमानी, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला
अण्णाभाऊ साठे चौकातून अजितदादांची भव्य रॅली
ना. धनंजय मुंडेंनी उचलला बीड जिल्ह्याच्या विकासाचा विडा
बीड (रिपोर्टर): राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करून ही सभा उत्तर सभा नव्हे तर उत्तरदायित्वाची सभा असल्याचे सांगून सभेच्या निमित्तातून बीड जिल्ह्याच्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी ही सभा असल्याचे म्हटले. त्यामुळे ना. मुंडेंनी बीड जिल्ह्याचा दुष्काळ मिटवणे आहे हा विकासात्मक ध्यास घेतला असून उद्याच्या सभेसाठी उपस्थित राहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या स्वागतासाठी बीडनगरी नटली आहे. बीड शहरात अजित पवार डेरेदाखल होताच दुपारी दोन वाजता अण्णाभाऊ साठे चौकातून अजितदादांची भव्य रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल. त्याठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते कार्यक्रमस्थळापर्यंत निघणार आहे. सभास्थळ आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, जालना रोड प्रचंड प्रमाणात सजवण्यात आला असून बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. उद्याच्या सभेतून बीड जिल्ह्यासाठी काय भेटते याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे त्यामुळे सभेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये उद्या छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर जाहीर सभा होत असून या सभेसाठी खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील तटकरे, ना. दिलीप वळसे पाटील, ना. छगन भुजबळ, ना. धनंजय मुंडे, ना. हसन मुश्रीफ, ना. धर्मराजबाबा आतराम, ना. अनिल भाईदास पाटील, ना. संजय बनसोडे, ना. अदिती तटकरे, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर हे मंत्री उपस्थित राहणार आहेत. महत्वाचे खाते असलेले महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ उद्या बीडमध्ये डेरेदाखल होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी बीडनगरी पुर्णत: सजली आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड शिगेला पोहचला असून मंत्र्यांच्या स्वागतासाठी सभास्थळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जालना रोडसह बीड शहरात मोठमोठ्या कमानी लावण्यात आल्या आहेत. न भूतो ना भविष्यती, अशाप्रकारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे स्वागत बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीकडून केले जात नसून उद्याच्या या जाहीर सभेतून राजकीय उत्तरापेक्षा उत्तरदायित्व आणि बीड जिल्ह्याच्या समस्यांचे उत्तर शोधले जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादासंह सहकारमंत्री, अन्न व पुरवठा मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री, क्रीडा व युवक कल्याणमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, महिला व बालविकास मंत्री, कृषीमंत्री हे उद्या एका व्यासपीठावर आहेत. हे सर्व खाते अत्यंत महत्वाचे असून या खात्यांतर्गत बीड जिल्ह्याला मोठी मदत होणार असल्याने या सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
पुढच्या महिन्यात औरंगाबादमध्ये कॅबिनेट बैठक
कायम दुष्काळीस्थितीत आणि आर्थिक विकासाच्या दृष्ट्या मागास असलेल्या बीड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये दीड दशकापूर्वी मराठवाड्याच्या प्रश्नावर औरंगाबादेत महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा मराठवाड्यात कधी बैठक झाली नाही. आता ना. धनंजय मुंडे हे कॅबिेनट मंंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात व्हावी यासाठी प्रयत्न करत असून उद्या अर्धे मंत्रिमंडळ बीडमध्ये डेरेदाखल होत आहे तर पुढील महिन्यात औरंगाबादेत महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही प्रक्रिया धनंजय मुंडेंचे नेतृत्व काय आहे हे सर्व सांगून जाते.
धनंजय मुंडेंचा ध्यास, बीड जिल्ह्याचा विकास
लोकनेते कृषीमंत्री धनंजय मुंडे हे राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देत असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झालेले आहेत. आता महाराष्ट्राच्या पटलावर बीड जिल्ह्याचा दबदबा निर्माण करण्याहेतू विकासाभिमूख कर्तव्य कर्मातून मुंडेंनी ध्यास घेत बीड जिल्ह्याचा विकास करणे याकडे लक्ष दिले आहे. दुष्काळीस्थितीसह अन्य प्रश्न सोडवण्याहेतू ना. मुंडे हे प्रयत्नांची परिकाष्ठा करत असून त्याचा पहिला अध्याय उद्याच्या सभेतून लिहिला जात आहे. ही सभा राजकीयदृष्ट्या जितकी महत्वाची आहे तेवढीच बीड जिल्ह्याच्या विकासासाठीही महत्वाची आहे.