टाकीवर चढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
अनेक ठिकाणी
ठिय्या, अन्नत्याग, उपोषण यासारख्या आंदोलनाच्या माध्यमातून जरांगेंना
पाठिंबा
बीड (रिपोर्टर)- गेल्या तेरा दिवसांपासून सराटे अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यभरात त्याचे पडसाद उमटत असून बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी उपोषण सुरू आहे. डोंगरकिन्ही येथे गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेले आर.आर. येवले यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून इकडे कुटेवाडी येथे एका उपोषणकर्त्या तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेतल्याने त्याला वाचवण्यासाठी उपोषणकर्ते नंदकुमार कुटे हे पळत गेले तेव्हा तेही भुरळ येऊन खाली पडले. त्यामुळे त्यांनाही तात्काळ बीडच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
आर.आर. येवले हे गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून डोंगरकिन्ही येथे गावकर्यांसमवेत ते जरांगे पाटलांना पाठींबा देण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. आज त्यांची बीपी, शुगर लो झाल्याने प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे आज सकाळी कुटेवाडी येथे उपोषणास बसलेल्या एका तरुणाने अचानक ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत अंगावर डिझेल ओतून घेत काडी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसलेले नंदकुमार कुटे यांच्या सदरचा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या तरुणाचा पाठलाग करत त्याला पकडले आणि त्याच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेतली. या वेळी नंदकुमार कुटे यांना भुरळ आली. उपस्थित पोलिसांसह अन्य लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.