मराठवाड्यात फक्त 90 दिवसच हंगाम सुरू राहण्याचा अंदाज; उसाला चांगला भाव येणार
बीड (रिपोर्टर)- गेल्या वर्षी राज्यात उसाची लागवड कमी झाली. त्यातच यंदा अजूनही समाधानकारक पाऊस पडला नसल्याने उसाची वाढ खुंटली. याचा परिणाम ऊस उत्पादनावर होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाच ते सहा महिने इतका हंगाम चालणार. मराठवाड्यात तर ऐंशी ते नव्वद दिवसच हंगाम चालेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उसाचं क्षेत्र घटल्याने ऊसउत्पादक शेतकर्यांच्या उसाला चांगला भाव येणार आहे.
मागच्या वर्षी 14.87 लाख हेक्टर ऊस गाळपासाठी होता. त्यापैकी 10 10 लाख 53 हजार मे.टन उसाचे गाळप झाले. सलग दोन वर्षे उसाचं उत्पादन वाढल्यामुळे शेतकर्यांना कारखान्याला ऊस टाकण्यासाठी कारखानदारांचे उंबरे झिजवावे लागले. काही शेतकरी तर अगदी मेटाकुटीला आले होते. उसाचे क्षेत्र वाढल्याने गेल्यावर्षी बहुतांश शेतकर्यांनी ऊस लागवड केली नाही. त्याचा परिणाम यंदा साखरेच्या उत्पादनावर होणार आहे. उसाची कमी लागवड आणि यंदा पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे उसाची योग्य पद्धतीने वाढ झालेली नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील दोन-चार जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा उसाचं क्षेत्र घटलेला आहे. उसाचा हंगाम सहा महिने चालत असतो यंदा मात्र पश्चिम महाराष्ट्रात चार ते साडेचार महिने इतकाच चालू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला. मराठवाड्याची परिस्थिती त्यापेक्षा बिकट आहे. मराठवाड्यात दोन वर्षे उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होती. यंदा मात्र त्यात प्रचंड प्रमाणात घट झालेली आहे. राज्यात चार्याची टंचाई निर्माण झाल्याने बहुतांश ऊस चार्यासाठी उपयोगात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात फक्त ऐंशी ते नव्वद दिवसच हंगाम सुरू राहील, असे सांगण्यात येत आहे. ऊसाला मात्र यावर्षी चांगला भाव राहील, असे दिसून येत आहे.