“जेव्हा मी निराश होतो, तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे. इतिहासात अनेक क्रूरकर्मे होऊन गेले आणि काही काळासाठी ते अजिंक्य पण वाटले, पण नेहमी शेवटी त्यांचा पराभवच झाला आहे” -महात्मा गांधी
गणेश सावंत
मो. नं. 9422742810
पारतंत्र्याच्या साखळदंडात जखडून ठेवलेल्या भारताला स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले. एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल पुढे करा म्हणणार्या अहिंसेमुळे स्वातंत्र्य मिळाले काय? दोन-चार इंग्रज अधिकार्यांना गोळ्या घालून ठार मारले. त्यात क्रांतीकार्यांना फासावर जावे लागले, त्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले काय? पारतंत्र्याचा काळोख प्रकाशमय आणि तेजोमय करण्यासाठी स्वातंत्र्याचा तो दिवा कोणाचा असे एक ना अनेक प्रश्न जेव्हा तथाकथीत बुद्धीजीवी विचारतात किंवा त्यांना पडतात तेव्हा त्यांची किव करावीशी वाटते. आजही गांधींना खलनायक आणि त्यांचा मारेकरी असलेला नथूराम याला नायक ठरवण्याहेतू काही शक्ती आपली अक्कल पाजळतांना दिसून येतात. रक्ताचा एक थेंबही न सांडता महात्माजींनी स्वातंत्र्य मिळवले काय? असा सवाल विचारतात. अशांना आमचे एकच उत्तर आहे रक्ताचा एक थेंबही न सांडता अखंड हिंदूस्थानला स्वातंत्र्य मिळालं नाही, स्वातंत्र्य ही अशा स्वस्तात मिळणारी चिज नाही. ज्या साम्राज्यावर सुर्य कधी मावळत नव्हता त्या ब्रिटिशांच्या साम्राज्यातून सुटका होणे ही सर्वात मोठी कठीण बाब होती. अशा स्थितीत या देशाला स्वातंत्र्य मिळाले ते केवळ आणि केवळ सर्व प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि त्यानंतर स्वातंत्र्याचा दीप क्रांतिकार्याच्या बलिदानातून अन् महात्मा गांधींच्या अहिंसेतून प्रज्वलीत झाला. नेताजी दुसर्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेनाचे सरसेनानी झाले. डाव हात मृत्यूच्या खांद्यावर टाकून उजव्या हाताने ते लढत राहिले. तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा अशी गगनभेदी घोषणा करत भारतीय तरुणांच्या मनामनात आणि तणातनात स्वातंत्र्याबाबत उर्मी तयार केली. त्यामुळे जे इंग्रजाच्या घरी पाणी भरायचे, संडास साफ करायचे, इंग्रज राजवटीबाबत निष्ठा ठेवायचे, त्या लोकात आणि तेव्हाच्या पोलीस दलात स्वातंत्र्याची आकांक्षा उसळली. राजनिष्ठा संपली आणि ब्रिटिश राज्याचा पाया ढासळला. पुढे महात्मा गांधींच्या अपुर्व सविनय सत्याग्रहामुळे देशभराची जनता स्त्रीयांसह आंदोलनासाठी रस्त्यावर उतरली. तेव्हा खरी स्वातंत्र्याची ललकारी आवाजातून नव्हे तर प्रत्येक भारतीयांच्या धमन्यांमधून उसळली. स्वातंत्र्य हे अबाधीत त्रिवार आपला हक्क आहे हे समजणे म्हणजेच गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळणे होय, तेच गुलामगिरीच्या मानसिकतेतलं स्वातंत्र्य हे सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोसांनी दिलं. पाठोपाठ क्रांतिकारी भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या इनक्लाब जिंदाबादच्या रक्ताळलेल्या नार्यात तरुणांच्या मनगटात ताकद आली. अन् इथच स्वातंत्र्यासारख्या चळवळीला अधिक महत्त्व प्राप्त झाले.
गांधीजींचं महत्त्व काय?
असा सवाल करणार्या नत्द्रष्ट आणि बुद्धीभ्रष्ट माणसांसाठी आम्ही म्हणू जागतिक शांतीचे दुत गौतम बुद्धांनंतर या भारतात अहिंसेचे दुत हे महात्मा गांधी ठरले. ज्या माणसाने हिंसेला कधीही प्रोत्साहित केले नाही. मात्र अहिंसेच्या जोरावर 114 पौड वजनाच्या हाडकुड्या गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ज्यावेळी दिल्लीत सत्ते सोहळे सुरू होते. तेव्हा जातीय दंगलीत तप्त झालेल्या कलकत्त्यात शांतता राखण्यासाठी महात्मा गांधी तेथे गेले होते,तेव्हा अनेकांना गांधींची हत्या होईल असे वाटले होते. मात्र गांधींवर दगडफेक झाल्यानंतरही गांधी बाहेर आले आणि माझ्या मरणाने तुमचे समाधान होत असेल तर मला मारून टाका असे त्यांनी स्पष्ट म्हटले. दंगेखोरांनी मारले नाही, शत्रूंनी मारले नाही, इंग्रजांनी गोळी चालवली नाही या महाराष्ट्र मातीचे आजपर्यंतचे सर्वात पहिले दुर्दैंव ठरले ते नथूरामच्या हातून गांधींची हत्या घडणे, नथूराम सारखी अतिरेकी पैदास महाराष्ट्रात जन्माला येणे ही महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासातल्या ओळीमधील काळी ओळ ठरली. असो गांधींना कोण काय म्हणील यापेक्षा गांधी किती मोठे आहेत ते आजही कळते, एकीकडे गांधींच्या मारेकर्याचं उदात्तीकरण करायचं, गांधींचा द्वेष करताना तो द्वेष तरुणांच्या मनामनात पसरविण्या हेतू षडयंत्र करायचे आणि दुसरीकडे व्यासपिठावरून वेगवेगळ्या देशाच्या व्यासपिठावर गांधींना पुजायचे, आज त्याच गांधींच्या विचाराचे आम्ही पायीक आहोत म्हणून हातात झाडू घेत गांधींना शिव्या घालणारे राजा आणि रंक रस्ते साफ करताना दिसतायत, हे आहे गांधींचं महत्त्वं.
गांधींच्या अहिंसेला किंमत ती काय?
अरे दळभद्य्रांनो नथुरामचे उदात्तीकरण करणार्यांनो गांधींची अहिंसा ही विरांची अहिंसा ठरली. गांधींच्या अहिंसेला जागतिक महत्त्व प्राप्त झाले. त्याच गांधींना मृत्यूनंतर एकेरी भाषेत बोलणार्या तथाकथीत धर्मांधांनो गांधी आणि त्यांची किंमत शब्दात आणि मुल्यात करताच येणार नाही. गांधींचा सविनय सत्याग्रह म्हणजे ‘एक धक्का और दो, अंग्रेजो को भगा दो’ असाच ठरला. गांधींजींचं महत्त्व अथवा त्यांचं वैशिष्ट्य सांगताना त्यांच्या अन्य महान पुरुषांप्रमाणे जन्मापासून मोठेपणाची लक्षणे दिसलीच नाहीत. हे सत्याचे प्रयोग वाचल्यानंतर लक्षात येते. येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण अथवा भगवान बुद्ध हे जन्मजात मोठे होते. त्यांच्या बालपणातील लिलाच तशा होत्या पण महात्मा गांधी यांनी लहानपणीच शाळेत असतांना मित्राच्या नादी लागून मास मच्छी खाणे, घरातलं सोनं विकणे यासह गैरगोष्टी केल्या. आईने जेव्हा झापले तेव्हा ते सुतासारखे सरळ झाले अन् इंग्लंडला जावून बॅरिस्टर होवून आले. त्यांच्या ‘महात्मा’ या करिअरची (आपण म्हणू) सुरूवात दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णभेदावरून झाली. अन्याय सहन करायचा नाही, हे महात्मा गांधींचे आयुष्यभरातले तत्व होते. अशावेळी प्रश्न पडतो, निशस्त्र आणि दुर्बल माणसांनी काय करायचे? त्या प्रश्नाचे उत्तर महात्मा गांधींनी नव्या मार्गातून दिले. अन्यायाविरूद्ध प्रेरणेने आणि प्रतिभेने सुचलेलेले ते उत्तर, तो मार्ग सविनय सत्याग्रहाचा होता आणि या सविनय सत्याग्रहामध्ये जेव्हा घरातल्या महिलाही स्वातंत्र्य चळवळीत उतरल्या तेव्हा स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्याला जे स्वरूप प्राप्त झाले तिच खरी गांधींची किंमत. उभे आयुष्य सत्य आणि अहिंसेच्या वाटेवर चालून खर्च करणार्या या विराच्या अहिंसेला जगभरात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले म्हणूनच
तेव्हा सत्याचे प्रयोग
आता सत्तेचे प्रयोग
याची तुलना जेव्हा आम्हीच काय या देशातला आणि या जगातल्या कुठल्याही नागरिकांनी केली तर सत्याच्या प्रयोगाचे पारडे जड राहिल. आज ज्या पद्धतीने जात-पात-धर्म-पंथ याचे ध्रुवीकरण करून सत्ता हीच सत्त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले जात आहे. अशा कर्मदरिद्य्रांसाठी आमचे एकच सांगणे आहे मोहन करमचंद गांधी नावाच्या सात वर्षाच्या पोरानं राजा हरिश्चंद्राचं नाटक पाहितलं त्या नाटकाचा प्रभाव त्या बालमनावर एवढा पडला की तोच मोहन गांधी नावाचा पोरगा उभं आयुष्य सत्य आणि अहिंसा घेवून महात्मा झाला. आज सत्तेच्या प्रयोगातून लेकरं काय शिकतील. काल परवा आम्ही एक व्हिडीओ पाहितला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर एक दहा वर्षाची चिमुकली प्रश्न करतेय साहेब प्राईम मिनिस्टर तर मोदीजी आहेत, ते आमच्या लक्षात राहिले मात्र महाराष्ट्राचे सीएम आधी तुम्ही होता नंतर ठाकरे झाले नंतर शिंदे झाले आता पवार होणार आहेत आम्ही ते लक्षात कसे ठेवू? तो चिमुकलीचा प्रश्न नव्हता तर सत्तेच्या प्रयोगासाठी केलेला बुधवार पेठेतला बाजारूपणा होता. जे लोक सत्याची हत्या करून सत्तेसाठी काहीही करतात, त्या लोकांनी महात्मा गांधींवर शिंतोडे उडवावेत अरे थुँऽऽ, महात्मा होण्यासाठी हजारो लाखो रुपयाच्या जॉकेटची वेशभुषा करावी लागत नाही, महात्मा होण्यासाठी कॅमेर्याच्या लेन्सला महत्त्व देवून विश्वगुरूही होता येत नाही, महात्मा व्हायचं असेल तर त्याला
नंगा फकीर
व्हावं लागतं, तिथं मोहं माया सोडून द्यावी लागते, हुकूमशाही वृत्ती दुमटून ठेवावी लागते. प्रसिद्धीपासून कोसो दुर राहत कर्म हेच धर्म मानावे लागते. महात्मा गांधी इतर सर्व काँग्रेस नेत्यांपेक्षा फार वेगळे होते. त्यांना अत्यंत कमी वेळात त्या काळच्या कुठल्याही नेत्याला गुंडाळता आले असते, महात्माजींचा ज्या पद्धतीने सुरूवातीपासून फाळणीला विरोध होते, मात्र दुर्दैवाने फाळणी करावी लागली. एकमात्र खरे गांधी आणखी दोन महिने थांबले असते तर फाळणीचे जणक जिना हे क्षयाने मृत्यू पावले होते. जिनाचा हट्ट हा फाळणीचा खरा चेहरा आहे. हे सर्वश्रूत आहे. मात्र गांधींना फाळणीचे जनक म्हणून जबाबदार धरणे हे बुद्धीभ्रष्टांचे धोरण सत्याचे नव्हे तर सत्तेचे तोरण बांधण्या हेतू केेलेला प्रयास म्हणावा लागेल गांधी किती मोठे हे शब्दात सांगणे कठीण असले तरी सविनय सत्याग्रह किती महत्वाचा हे ब्रिटनचे पंतप्रधान लॉर्ड अॅटली यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सांगितलेल्या स्पष्टीकरणावरून दिसून येते, ते म्हणाले, ‘आता लश्कर व पोलीस दलात राजनिष्ठा नाही, महात्माजींच्या आंदोलनामुळे ती राजनिष्ठा संपली, लोक रस्त्यावर उतरत आहेत, ब्रिटिशांनी सत्ता सोडून परत येण्याची हीच वेळ आहे,’ लॉर्ड अॅटली यांनी सांगितलेले हे ऐतिहासिक सत्य आहे. आमचे नेताजी बोस, महात्मा गांधी, शहीद भगसिंंगांसारखे अनगिणत क्रांतीकार आणि त्यांनी केलेला त्याग आणि त्यांच्या बरोबर अनामिक असलेले स्वातंत्र्याचे बहाद्दर सैनिक या सर्वांना गांधी जयंतीदिनी सहस्त्रश: वंदन! जय हिंद जयहिंद जयहिंद!!!
(क्रमश:)
उद्याच्या अंकात वाचा………..“गांधींचे तुकोबा”