गेवराई (रिपोर्टर): राज्य सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गेवराईमधील मराठा समाजाने ऋषीकेश बेदरे यांच्या अटकेचा तीव्र निषेध करत बेदरे यांच्यावर जाणीवपुर्वक अटकेची कारवाई केल्याचे म्हटले. मराठा योद्धा ऋषीकेश बेदरे व सहकारी यांच्या बेकायदेशीर अटकेचा मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध अशा आशयाचं निवेदन तहसीलदारांसह पोलिसांना देण्यात आलं. हे निवेदन देण्यासाठी शास्त्री चौकातून रमाठा समाजाच्या वतीने मोठी रॅली काढण्यात आली होती.

सराटी अंतरवलीत झालेल्या लाठीमार, दगडफेक प्रकरणी ऋषीकेश बेदरे या मराठा आंदोलकासह अन्य तिघांना पोलिसांनी घटना घडल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अटक केली. याचे पडसाद गेवराईत उमटताना दिसून येत असून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिल्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचे सांगत गेवराईत आज सकाळी मराठा समाज एकवटला. शहरातल्या शास्त्री चौकात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज जमा होऊन त्यांनी ऋषीकेश बेदरेंच्या अटकेविरोधात रॅली काढली. राज्य सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या लेटरपॅडवर त्यांनी तहसीलदारांना एक निवेदन दिलं, या निवेदनात पोलिसांनी त्या काळ्या दिवशी मराठा समाज बांधवांवर अमानूष लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक महिला भगिनी, ज्येष्ठ नागरीक आणि मराठा समाज बांधव पोलिसांकडून चिरडले गेले. ऋषीकेश बेदरेंसह अनेक मराठा समाजातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले. तब्बल सत्तर दिवसांनी झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी बेदरे यांना अटक केली. मराठा आंदोलन चिरडण्यासाठीच पोलिसांचं हे षडयंत्र असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. ऋषीकेश बेदरे व त्यांच्या सहकार्यांना केलेली अटक ही बेकायदेशीर असून त्यांच्या पाठिशी मराठा समाज खंबीरपणे उभा आहे. अटक केल्यानंतर त्यांची सुरू असलेली बदनामी तात्काळ थांबवावी, असेही निवेदनात म्हटले आहे. सदरचे निवेदन हे तहसीलदार, पोलीस प्रशासन यांना देण्यात आले असून त्याच्या प्रत मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत.