‘ईडी’ सरकारचा महाविकास आघाडीला दुसरा धक्का
मुंबई (रिपोर्टर) महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 10-12 दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यातील काही गोष्टी या अभूतपूर्व अशा स्वरूपाच्या आहेत. आज राज्याच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्यासाठी सर्वच पक्षांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे असा पक्षादेश जारी केला होता. तशातच आता शिवसेनेच्या बंडखोर गटाने हा आदेश धुडकावून लावत शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटरहेडवरून भरत गोगावले यांच्या स्वाक्षरीचा दुसरा व्हिप जारी केला होता. दरम्यान, महाविकास आघाडीला मोठा धक्का लागला असून राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूनं 164 मतं पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात 107 जणांनी मतदान केलं. तर 3 जण मतदानादरम्यान तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा करत नार्वेकर यांच्या नावाची घोषणा केली.
चेतन तुपे यांच्याकडून राजन साळवी यांचा प्रस्ताव देण्यात आला. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडून राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव देण्यात आला. विरोधकांनी पोल मागितल्यानं आवाजी मतदानाच्या पुढची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अध्यक्षपदासाठी सभागृहात शिरगणती करण्यात आली. दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून शिवसेनेच्या व्हिपला केराची टोपली दाखवण्यात आली. व्हिपमध्ये ठाकरे गटातील 16 आमदारांसह सर्व आमदारांनी भाजपाच्या राहुल नार्वेकर या उमेदवारालाच मतदान करण्याचा पक्षादेश जारी करण्यात आला होता. त्यामुळे सध्या विधानसभेत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये ’व्हिप-वॉर’ सुरू झाली होती. भाजपकडून राहुल नार्वेकर, तर शिवसेनेकडून राजन साळवी रिंगणात होते. अध्यक्षपदासाठी मतदानाची मागणी करण्यात आली होती. या निवडणुकीत नार्वेकर यांनाच मत देण्यासाठी शिवसेना पक्षाने (शिंदे गट) आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप पक्षाच्या उर्वरित 16 आमदारांना देखील लागू असल्याचं सांगण्यात आलं होतं. व्हीपची प्रत या आमदारांना महोदयांना देखील पाठवण्यात आला होती.
शिवसेनेत ’व्हिप’वरून संघर्ष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रतोद म्हणून नेमलेले भरत गोगावले यांनी भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी व्हिप काढला होता. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी पक्षादेश काढला. त्यामुळे नेमका व्हिप कुणाचा? यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात संघर्ष झाल्याचं मतदानापूर्वी पाहायला मिळत होते. शिंदे यांच्यासोबत 39 तर ठाकरे गटात 16 आमदार होते. शिंदे गटातर्फे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी राहुल नार्वेकर यांना मतदानाचा व्हिप काढला तर ठाकरे गटातर्फे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी साळवी यांना मतदान करण्याचा व्हिप जारी केला होता. राष्ट्रवादी व काँग्रेसने साळवी यांना, तर भाजपने नार्वेकर यांना मत देण्याचा व्हिप काढला होता.
बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार;
50 आमदारांनी साथ दिली ते माझं भाग्य
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली त्याबद्दल सरकारच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. या सभागृहाचा अध्यक्ष झाल्यानंतर मोठी मानाची पदे भूषवणारे नेते आहेत. देशपातळीवर नेत्यांना गौरवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत घडणार्या घटनांची नोंद सगळ्यांनी घेतली आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक घटना आहे. कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करत होता. परंतु आता तुमची गरिमा वाढली आहे. सामाजिक जीवनातील व्याप्ती वाढली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील 12 कोटी जनतेचे प्रतिक असलेल्या सार्वभौमत्व सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी आपण विराजमान झाला आहात. राज्यातील गोरगरिबांचे, शेतकर्यांचे प्रश्न आपल्या माध्यमातून सुटतील अशी अपेक्षा आहे. त्याचसोबत लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण अबाधित राहील. आपण न्यायदान करता कायद्यासमोर सर्व समान तत्वाने काम कराल अपेक्षा. राज्याचा कारभार पारदर्शकपणे चालवायचा आहे. प्रसंगी आपण मुक्तपणे निर्णय घेऊन मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितले.
भाजपात मूळचे लोक कमी,
अजित पवारांची तुफान फटकेबाजी
याआधी सत्ताधारी आणि आता विरोधी बाकावरुन पाहिलं तरी समोर मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्तच पहायला मिळत आहेत. ते पाहून मूळच्या भाजपाच्या लोकांचं वाईट वाटतं.पहिली लाईन पाहिली तरी लक्षात येईल. दिपक केसरकर तर आता कसले प्रवक्ते झाले आहेत. आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
फडणवीसजी तुमचं अभिनंदन कसं करावं?,
बाळासाहेब थोरातांची विचारणा
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. आता फडणवीस तुमचं अभिनंदन कसं करावं असा प्रश्न पडला आहे. भुजबळांनी उल्लेख केलेल्या बुद्धिबळाच्या खेळाकडे तुमचंच लक्ष नव्हतं असं वाटत आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले.