गेवराई (रिपोर्टर) गेवराई – कॉलेज ला जाताना रोजच्या रोज मोटारसायकलवरून पाठलाग करून शिट्ट्या मारून डायलॉग बाजी करत शेरेबाजी करणार्या दोन टवाळखोरांना वैतागलेल्या तरुणींनी भर रस्त्यात आडवून चोप देत मोटारसायकल सह दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना काल गेवराई शहरातील ताकडगाव रोडवरील न्यू हायस्कूल शाळेसमोर घडली. दरम्यान याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती देऊनही तब्बल अर्धा तासानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले
असल्याने पोलीस प्रशासनाबत नागरिकांतून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बाहेर गावातून गेवराई शहरात शिक्षणासाठी आलेल्या तीन तरुणी शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये जात असताना काही टवाळखोर तरुण रोजच्या रोज मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग करत कट मारून शेरेबाजी करत होते. दरम्यान या टवाळखोरांच्या रोजच्या छेडछाडीला वैतागून त्यांनी काल ताकडगाव रोड वरील न्यू हायस्कूल शाळेच्या गेटसमोर थेट त्या तरुणांना अडवून गाडीची चावी हिसकावून घेत दोघांना भर रस्त्यात सिनेस्टाईल चोप दिला. यानंतर जमलेल्या गर्दीतल्या नागरिकांना त्यांनी पोलिसांना बोलावून घेण्याची विनंती केली. दरम्यान याबाबत अनेकांनी गेवराई पोलीस ठाण्याच्या नंबर सह संबंधित अधिकार्यांना या घटनेची माहिती दिली. मात्र यानंतरही गेवराई पोलीस शहरात अशी घटना घडलेली असताना तब्बल अर्ध्या तासानंतर घटनास्थळी पोहचले तो पर्यंत या तरुणींना या टवाळखोरांना पकडून ठेवले यानंतर ठाण्याचा एक कर्मचारी या ठिकाणी दाखल झाला यानंतर पोलिसांनी एका मोटारसायकल सह दोन तरुणांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेऊन चौकशी करून समज देत प्रतिबंधक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र शहरातील या वाढत्या छेडछाडीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाबाबत पालकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गेवराई शहरात छेडछाडीचे प्रकार वाढले ;
चिडीमार पथक नावालाच
शहरात आशा अनेक घटना समोर येत असताना मात्र पोलीस प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत असून पोलिसांचा धाक नसल्याचे दिसून येत आहे. काल घाडलेल्या घटनेबाबत या तरुणींनी अनेकांना पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन केल्यानंतर घटनास्थळावरून अनेकांनी पोलिस ठाण्याला व अधिकार्यांना याबाबत माहिती दिली. मात्र यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत या मुलींना या टवाळखोरांना पकडून ठेवत भर रस्त्यात ताटकळत उभा रहावे लागले याचे गेवराई पोलिसांना कुठलेच गांभीर्य नसल्याचे दिसून आले.
चोरीच्या घटनांसह गुन्हेगारीत
वाढ ; पोलिसांची कारवाई मात्र शून्य
गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई शहरात चोरीच्या घटनांसह मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असताना गेवराई पोलीस मात्र दलालांचे हस्तक झाल्याचे दिसून येत आहे. गेवराई शहरासह अनेक भागात चोरी- मारामारी आशा अनेक घटना घडत असताना याकडे मात्र साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आसून याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.