बीड (रिपोर्टर): गाळ उपसल्यानंतर झोपी गेलेल्या पोकलेनच्या चालकासह त्याच्या सहकार्याचय अंगावर टिप्पर पाठीमागे घेताना हे दोघेजण चिरडले गेले. ही दुर्दैवी घटना रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान पालीच्या तलावात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. सकाळी बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून टिप्पर चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या पालीच्या तलावातून गाळ उपसला जात आहे. गाळ उपसण्यासाठी अनेक जेसीबी-पोकलेन या ठिकाणी आहेत, रात्री उशिरापर्यंत गाळ उपसल्यानंतर पोकलेन चालक सुभाषकुमार गौतमप्रसाद चव्हाण, रा. बिहार व त्याचा सहकारी समाधान बाळु थोरात, रा. सावरगाव हे दोघे तलावामध्ये झोपले होते. गाळ नेण्यासाठी आलेला टिप्पर (क्र. एम.एच. 23 ए. यू. 2003) च्या चालकाने मागे पुढे न पाहता टिप्पर पाठीमागे घेतले. पाठीमागे झोपलेले दोघेजण चाकाखाली चिरडले गेले, यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. टिप्पर चालकास ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.