राज्यात मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या दमदार पावसाची हजेरी लागली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने राज्यातील धरणांमधला पाणीसाठा वाढलाय. आज राज्यातील एकूण धरणे 62.89% भरली आहेत. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरण आणि बंधार्यांमधून आज सकाळपासून विसर्ग सुरू आहे. परिणामी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येणार आहे. सध्या मराठवाड्यातील एकूण धरणसाठा हा 19.91 टक्क्यांवर आहे.
पावसाला जवळजवळ दोन महिने होत आले असले तरी मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने धरणे अजून कोरडीच असल्याचे चित्र होतं. मागील काही दिवसात झालेल्या पावसाने धरणांच्या जलसाठ्यात काही अंशी वाढ झाल्याचे जलसंपदा विभागाने सांगितलं. नाशिकच्या पाच धरणांमधून सध्या विसर्ग सुरू असल्याने जायकवाडीतील धरण साठ्यात आता वाढ होणार आहे.
जायकवाडी धरणात किती पाणीसाठा आहे?
मराठवाड्यातील सर्वाधिक क्षमतेचे असणारे जायकवाडी धरण मागील काही दिवसात केवळ चार ते पाच टक्क्यांवर होते. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने हा साठा आता वाढला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज जायकवाडी धरण 10.35 टक्क्यांनी भरले आहे. मराठवाड्यातील इतर धरणांमध्ये पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होतानाचे चित्र आहे. या धरणसाठ्यात हळूहळू वाढ होत असली तरी सिंचनासह, शेती आणि पिण्यास किती दिवस हे पाणी पुरेल याची शंका आहे. मराठवाडा विभागात 11 मोठे, 75 मध्यम तर 749 लघु प्रकल्प आहेत. गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवर 42 बंधारे आहेत. एकूण 877 प्रकल्पांमध्ये अवघा 20 टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे.उत्यामुळं लघु आणि मध्यम प्रकल्प दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
गोदावरी नदीपात्रात होतोय विसर्ग
नाशिक विभागातील धरणांमधून सध्या विसर्ग सुरू असून गोदावरी नदीपात्रात पाणी वाढत आहे. दारणा धरणातून 22,966 क्युसेकने विसर्ग सुरू असून नांदूर मधमेश्वर बंधार्यातून 36 हजार 731 क्युसेकने गोदावरी पात्रात विसर्ग सुरूय. सध्या नदीतील पाणी पातळी ही 468.49 मी. इतकी आहे. यासह नेवासा शेंदूरवादा या भागातूनही गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे.
नाशिक विभागाच्या कोणत्या धरण-बंधार्यांमधून होतोय विसर्ग?
1. दारणा धरण 22966 क्यूसेक
2. नांदूर मधमेश्वर बंधारा 36731 क्सूसेक
3. नाशिक शहर होळकर पूल 4881 क्यूसेक
4. भंडारदरा धरण (नगर) 27114 क्यूसेक
5. कडवा धरण 11297 क्यूसेक
6. भाम धरण 6470 क्युसेक
7. ठेंगोडा बंधारा 6963 क्युसेक
8.पालखेड 5570 क्युसेक
9. चणकापूर धरण 2231 क्युसेक
10 निळवंडे धरण 13755 क्युसेक
11. आढळा धरण 1439 क्युसेक