पाटोदा (रिपोर्टर): पाऊस नसल्याने जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश्य भिती व्यक्त होत असताना काल सायंकाळी पाटोदा सह परिसरात धुवॉधार पाऊस झाल्याने मांजरा नदीला महापूर आला. मांजराचा उगम हा याच परिसरात असल्याने आणि मांजरा नदी शहरातून जात असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे जोरदार पावसामुळे पाटोदासह परिसरात नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाटोदा, दासखेड, थेरला, अंमळनेर या मंडळात मोठा पाऊस झाला. तर सर्वाधिक 103 एमएम पाऊस पाटोदा मंडळात झाला. पूरपरिस्थितीची पाहणी तहसीलदारांसह अन्य प्रशासनातील अधिकार्यांनी केली.
बीड जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसल्याने अनेक तलावात आजही दहा टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा उपलब्ध असल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य भिती व्यक्त केली जात आहे. सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना काल सायंकाळी मात्र पाटोदासह परिसरातील अन्य चार मंडळात मुसळधार पाऊस झाला.
सर्वाधिक पाऊस हा पाटोदा मंडळात झाला असून सुमारे 103.9 एमएम एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तब्बल 15 वर्षानंतर पाटोद्यात मुसळधार पाऊस झाल्याचे सांगण्यात येते. या पावसामुळे शेतीचे आणि शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या शेतातील माती अक्षरश: खरडून गेल्याचे सांगण्यात येते. या पावसामुळे मांजरा नदीला पूर आला. मांजरा नदीचे उगमस्थान पाटोद्यातच असल्याने आणि सदरची नदी ही पाटोदा शहरातून जात असल्याने आज पाटोदा शहरात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली.