ग्रामीण भागात चोर्यांचे प्रमाण जास्त
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून चोर्यांचे प्रमाण वाढले, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक नवीन आले असून ते या प्रकरणी दखल घेणार का? गेल्या दोन दिवसांमध्ये सात ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. या घटनात चोरट्याने हजारो रुपयांचा माल लंपास केला. चोरटे घरफोडी तर करतच आहे, मात्र काही ठिकाणी जनावरांची सुद्धा चोरी होऊ लागली. गोठ्यात आणि रस्त्याच्या कडेला बांधलेली जनावरे सर्रासपणे चोरीस जाऊ लागले. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन दिवांमध्ये जिल्ह्यात सात ठिकाणी चोर्या झाल्या, त्यामध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव मंजरा येथील प्रभूराम खाडे यांची ऐंशी हजाराची म्हैस अज्ञात चोरट्याने चोरून नेली. आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील एका मंदिरामध्ये दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र चोरट्यांना या ठिकाणी चोरी करण्यात यश आले नाही. आष्टी तालुक्यातीलच शिराळ येथील नंदा खेडकर यांच्या घरातील 68 हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. आष्टी शहरातील गोंधळ गल्ली येथील आरेफ पठाण यांच्या घरात चोरी होऊन 65 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुक्कडगाव येथील पवन नवले यांची मोटारसायकल क्रमांक एम.एच.20 सी.एस. 3268 ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या मोटारसायकलची किंमत 30 हजार रुपये होती. माजलगाव तालुक्यातील वारोळा येथील एका देवीच्या मंदिरामध्ये चोरीचा प्रयत्न झाल आहे तसेच माजलगाव तालुक्यातीलच दिंद्रुड येथील बालासाहेब सोळंके यांची एक शेळी, पाच बकरे चोरून नेले. या बकर्यांची किंमत 50 हजार रुपये इतकी होती. या सर्व चोरीच्या घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज जिल्ह्यात तीन ते चार चोरीच्या घटना गडू लागल्या. जिल्हा पोलीस अधिक्षक नवीन आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना निर्देश देण्याची मागणी केली जात आहे.








