बीड (रिपोर्टर): बदलापूर बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी द्या, या मागणीसाठी संतप्त होत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बांगड्या फोडून सरकारविरोधात घोषणा दिल्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बदलापूर येथील भाजपाच्या एका नेत्याच्या शाळेमध्ये चार व सहा वर्षाच्या मुलीवर तेथील सफाई कामगाराने बलात्कार केला. या घटनेचा संताप अवघ्या राज्याला झाला आणि लोक रस्त्यावर उतरले. त्याचे पडसाद काल बीडमध्येही उमटले. ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते. 20 मिनिटांच्या या आंदोलनात आंदोलकांनी रस्त्यावर काचेच्या बांगड्या फोडल्या. शिंदे सरकारचे करायचे काय, काली मुंडके वर पाय अशा घोषणा देत रस्ता अडवला. त्यामुळे रहदारीला अडथळा झाल्याचे सांगत शिवाजीनगर पोलिसांनी आंदोलकांविरोधात अभिजीत सानप, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजीनगर यांच्या फिर्यादीवरून जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, गोरख शिंगणे, श्रीकृष्ण गायके, मिरा नवले, अभिषेक दिवे, अशोक वैद्य, रमेश नवले, महादेव परसकर, संदीप भानप व इतर आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत बंदमध्ये सहभाग, बीडमध्ये कार्यकर्त्यांवर गुन्हे
आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, भाजपा सरकार होश में आओ, अशा घोषणा देत काल बीडमध्ये भारत बंदमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस ठाण्याचे अमलदार संतोष रणदिवे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काल प्रसाद लिंगेश्वर वासनीक, नितीन सोनवणे, बबन वडमारे, विलास जोगदंड, अजय सवाई, भारत कांबळे, सागर धनवे, अॅड. तुपे, प्रतिक ऊर्फ अजय नवनाथ सरवदे, के.के. वडमारे, अॅड. राहुल यांच्यासह अन्य जणांनी दुकाने बळजबरीने बंद करण्याच्या धमक्या दिल्या व रस्त्यावर घोषणाबाजी करत खासगीसह एसटी बसेस अडवून धरत सर्वसामान्य लोकांना वेठीस धरले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरातून रॅली काढली, म्हणून या सर्वांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.