आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा प्रचंड विकास झाला असला तरी शेतकर्यांच्या जीवनात विशेष काही क्रांती होतांना दिसत नाही. सध्याच्या परिस्थतीत शेती समोर अनेक बिकट संकट निर्माण होवू लागले. प्रशासन पातळीवर शेतकर्यांना तितका सन्मान मिळत नाही. सरकार फक्त कागदी घोडे नाचवण्यात मग्न असतं. शेतकर्यांसाठी ज्या काही योजना असतात. त्या योजना चांगल्या पध्दतीने राबवल्या जात नाहीत. योजनेसाठी वेळेवर अनुदान दिले जात नाही. अनुदानाची रक्कम वेळेवर न मिळाल्याने शेतकरी अधिकच कर्जबाजारी होेतात. अशा कर्जबाजारीतून शेतकरी स्वत:ला संपवतो. रोजगार हमी योजनेतील विहीर, शेततलाव याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी बेजार होत असतात. व्यवस्था इतकी निबर झालेली असते. त्यांच्यापुढे किती ही डोकं आपटलं तरी त्यांना काही घाम फुटत नाही. शेतकर्यांना जे काही योजनेचे पैसे मिळतात, ते पैसे पदरात पाडून घेण्यासाठी शेतकर्यांना लाचखोर कर्मचार्यांना पैसे द्यावे लागतात. कृषी विभागाने ‘पोखरा’ योजना सुरु केली. ही योजना दरवर्षी काही गावात टप्प्यानूसार राबवली जाते. या योजना अंतर्गत अनेक लाभ शेतकर्यांना घेता येतात. यात बराच बोगसपणा सुध्दा झाला. याला कारणीभूत कृषी विभाग आहे. कृषी विभागाचा इतका मोठा भ्रष्ट आणि अनागोंदी कारभार आहे. त्याला आळा घालायला राज्य सरकारला वेळच नसतो. राज्याचं कृषी विभाग नावापुरतचं उरलं आहे. आज राज्याचा कारभार हा रामभरोसेच आहे. राज्याला सध्या मंत्रीमंडळ नाही, हे शेतकर्याचं दुर्देव म्हणावं लागेल.
अतिवृष्टीचा फटका
सध्या पावसाचे दिवस आहेत. राज्यात चांगला पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस पडला. अतिरिक्त पावसाने जीनजीवन विस्कळीत झालं. नदी, नाल्यांना पुर आले. पुराच्या पाण्यात राज्यात आता पर्यंत अनेक जण वाहून गेले. पुराच्या पाण्याने शेतकर्यांचे नुकसान झालं. काही शेतकर्यांच्या जमिनी वाहून गेल्या. पिकांचं नुकसान झालं. पावसाची झड लागल्याने पीक खराब झाले. खरीपाचा जवळपास नव्वद टक्के पेरा पुर्ण झाला. शेतकर्यांसाठी खरीप पीक महत्वाचं असतं. वेळेवर पेरणी झाली तरच शेतकरी स्वत:ला समाधानी मानतो. मध्यंतरी पावसाने थोडा ताण दिला होता पण, गेल्या दहा दिवसापासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. मराठवाड्याचा विचार केला असता मराठवाड्यात यंदा सोयाबीन आणि कापसाची मोठया प्रमाणात लागवड झाली. शेतकर्यांने उसनवारी, किंवा कर्ज काढून बि, बियाणे आणि खतांची खरेदी केली. महागडं बियाणे आणुन शेतकर्यांने काळ्या आईची ओटी भरली. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील साडेतीन लाख हेक्टरमधील पिकांना फटका बसला. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करणे सुरु आहे. पंचनामे केल्यानंतर नव्या सरकारला कीव आली तरच शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळेल, नाही तर शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम हे सरकार करु शकतं. एकीकडे नुसतं गोड बोलायचं दुसरीकडे जे काही मनात आहे, तेच करायचं असचं आज पर्यंत सरकारचं धोरण राहिलेलं आहे. त्यामुळे या नवीन सरकारकडून खुप काही चांगलं घडेल असं वाटत नाही. साडेतीन लाख हेक्टरमधील नुकसान हे कमी नाही. ज्या शेतकर्याचं नुकसान झालं. त्या शेतकर्यांना आता पुन्हा नवीन बियाणं आणुन लागवड करावी लागणार. त्याला पुन्हा पैसे लागणार, नवीन लागवडीतून नेमकं किती उत्पन्न मिळणार हे येत्या काही महिन्यात समोर येईल. तो पर्यंत शेतकर्यांना आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे. शेतकर्याचं जितकं नुकसान झालं. तितकी नुकसान भरपाई आज पर्यंतच्या सरकारने दिली नाही. त्यामुळे आज झालेलं नुकसान शेतकर्यांना सहनच करावे लागणार आहे. अशा पध्दतीने शेतीची माती होत असल्यानेच शेतकरी शेतीला कंटाळलेले आहेत, पण पर्याय नसतो.
कापूस चांगलं उत्पन्न देईना?
कापसाचा पेरा वाढला 1990 नंतर, आता ही कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. नवीन, नवीन कापसाचं चांगलं उत्पन्न निघालं, पण सध्या कापसाचं चांगलं उत्पन्न निघत नाही. कापसाचे अनेक वाण बाजारात आले आहेत. त्या वाणाची शंभर टक्के खात्री देता येत नाही. किती ही खर्च केला तरी चांगलं उत्पन्नच निघत नाही. नवीन कापसाचं बियाणं लवकर किडीला बळी पडू लागलं. त्यात चांगली प्रतिकार शक्ती नाही. त्यामुळे ते कमकुवत ठरत आहे. एका बॅगला दोन किंवा तीन क्विंटल कापूस निघू लागला. काही ठिकाणी तितका ही कापूस निघत नाही. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी निघू लागलं. त्यामुळे ज्या ठिकाणी कापसाचं उत्पन्न अधिक घेतलं जात आहे. त्या ठिकाणी शेतकर्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या नोंदवल्या जात आहे. चांगलं उत्पन्न निघेल या आशेवर शेतकरी कापसाला किती ही खर्च करू लागला. शेवटी हाती काहीच पडत नाही. त्यासाठी शेतकर्यांनी वेगळ्या पिकांची निवड करायला हवी. तसं वेळोवेळी मार्गदर्शन कृषी विभागाने करायला हवं.
नवं विघ्न आलं
निसर्गाचा हल्ला शेतीवर नेहमीच होत असतो. त्याला तोंड देण्या शिवाय पर्याय नसतो. आता पिकावर नवीन रोग पडू लागले, हे रोग इतके प्रभावी आणि खतरनाक असतात, ते पिकांची पुरती वाट लावूनच सोडतात. दोन वर्षापुर्वी नाकतोड्यांनी थैमान घातलं होतं, हे नाकतोडे (टोळधाड) एकदा पिकावर बसले की, सगळं पिकच खावून परत जात होते. या नाकतोड्यांनी कित्येक शेतकर्यांचे पीक खल्लास केलं होतं. त्यानंतर अमेरिकन लष्करी आळी आली होती. ही आळी ही तितकीच खरनाक होती, या आळीने राज्यातील कित्येक हेक्टरमधील ज्वारीचे पिक फस्त केले होते. ज्वारीवर सहसा रोग पडत नसतो, पण गेल्या वर्षी ज्वारीवर सुध्दा आळीने हल्ला केला होता. मकाला ही आळीने विळखा घातला होता. या आळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकर्यांना महाग औषधांची फवारणी करावी लागली. उत्पन्न कमी आणि खर्चच जास्त करण्यात आला होता. यंदा गोगलगाईचं नवचं संकट उभा राहिलं. पाऊस चांगला पडल्याने शेतकर्यांनी पेरणी केली. सोयाबीन हे नगदी पिक आहे. सोयबीनचा चांगला पेरा राज्यात होत आहे. सोयाबीन उगवल्यानंतर त्याचे पाने गोगलगाईने खावून टाकले. राज्यातील शेकडो हेक्टरमध्ये गोगलगाईने नुकसान केले. याचे पंचनामे केले जात आहे. पंचनाम्याने काय निष्पन्न होणार? शासन भरीव मदत थोडीच देणार? आधीच काही शेतकर्याचं सोयाबीन उगवलं नाही. बोेगस बियाणामुळे बि उगवत नाही. त्यात पुन्हा गोगलगाईचा ताप, यात सोयाबीन पेरणार्या शेतकर्यांची कुपाट लागली. सोयाबीनला गेल्या वर्षी चांगला भाव होता. सोयाबीन हे तीन तेे चार महिन्यात येणारं पीक आहे, म्हणुन शेतकरी या पीकाला जास्त महत्व देत असतात. सोयाबीनला दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटाला सामोरे जावे लागते. यंदा सोयबीनचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. दर तीन वर्षाने गोगलगाईचा उपद्रव होत असल्याचं तज्ञाचं मत आहे. गोगलगाईला काही विलाज करता येत नाही, कारण हा प्राणी निसर्गाच्या सानिध्यातील आहे. निसर्गात वावरणार्या प्राण्याकडून शेतकर्यांचे नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे.
रानडुकरांनी कदर आणला
डुकरांची संख्या पुर्वी शहरी भागात होती. आता कुठं ही डुकरं दिसून येत आहेत. ग्रामीण भागात डुकरांची संख्या वाढल्याने या डुकरांचा शेतकर्यांना मोठा ताप सहन करावा लागत आहे. हाता, तोंडाला आलेला घास डुकरं उध्दवस्त करत आहे. पीक कोणतं ही असू द्या,त्याची नासाडी डुकरं करत असतात. दरवर्षी शेकडो हेक्टरमधील पिकांची नासाडी डुकरं करतात. उभा उस डुकरं खराब करतात. डुकरांच्या भीतीपोटी काही शेतकरी भुईमुग, मका हे पीक पेरतच नाहीत, हे दोन्ही पिकं पेरली की डुकरं ते पुर्णंता: उध्दवस्त करतात. डुकरांचा बंदोबस्त करणं अवघड झालं आहे. वन विभाग ही त्याला काही करु शकत नाही. काही शेतकर्यांनी डुकरांच्या उपद्रवामुळे शेतीला तारेचं कुपन घातलं. गरीब, शेतकरी कुंपन घालू शकत नाही. डुकरामुळे प्रत्येक शेतकर्याचं काही ना काही नुकसान होत आहे. एक ही पीक डुकराच्या तावडीतून सुटत नाही. डुकरं पीकाचं नुकसान करतात म्हणुन शेतकर्यांना शेतीत रात्रीचा पहारा द्यावा लागतो. डुकरं पीकचं नुकसान तर करताच पण माणसावर देखील हल्ला करतात. आता पर्यंत कित्येक शेतकर्यांना जखमी केलं आहे. डुकरासोबत हरीणांची संख्या देखील वाढली आहे. हरणं ही पिकांची नासाडी करत आहे. डुकरं, हारणं यामुळे शेतकर्यांना शेतीत नेमकं काय पेरावं हे कळेना, कारण आज चांगलं दिसणारं पीक उद्या दिसेच याची काही खात्री वाटत नाही. पिकाचं नुकसान झाल्यानंतर त्याची भरपाई मिळत नाही. वन्यप्राण्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान होवू लागलं. शेतकर्यांपुढे वन्य प्राणी, निसर्ग याचं संकट नेहमीच आ वासून उभा आहे. ह्या संकटामुळे शेतकरी खचत आहे. त्याचं दरवर्षी आर्थिक नुकसान होत आहे. शेतकर्यापुढील संकट कधी कमी होतील? नेहमीच्या संकटामुळे शेतकर्यांची आर्थिक सुधारणा होत नाही. शेती करणं हे मोठया जोखमीचा व्यवसाय झाला आहे. यात नफ्या ऐवजी तोटा आणि मानसीक ताणच जास्त सहन करावा लागत आहे. शेतीला चांगले दिवस येतील कधी असाच प्रश्न आहे?