दिल्ली (वृत्तसेवा) नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. यासाठी त्या ईडी कार्यालयात पोहचल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी आंदोलने करत आहे. ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी नोटीस पाठविली होती. आज गांधी या ईडी कार्यालयात गेल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या सोबत प्रियंका गांधी सुद्धा आहेत. ईडीने यासाठी 50 प्रश्नांची यादी तयार केली आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या वतीने ईडीच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे.
ईडी कार्यालयासमोर निदर्शने
मुंबईत काँग्रेसतर्फे सीएसएमटी स्टेशन ते ईडी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येत आहे. ईडी कार्यालयासमोर काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत. ईडी व भाजपविरोधात कार्यकर्ते घोषणा देत आहे. आंदोलनात सहभागी माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या, भाजप नेते देशातील वाढती बेरोजगारी, गॅस दरवाढीवर बोलत नाही. मात्र, जे विरोधक या मुद्द्यांवर सत्ताधार्यांना प्रश्न विचारतात त्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. सोनिया गांधी यांची ईडी चोकशी हा यातीलच एक प्रकार आहे.