गेवराई, दि.26 (प्रतिनिधी) ः- महायुतीमधील भाजप सरकार घटक पक्षावरील मराठा, अल्पसंख्यांक, दलित आदी समाजातील मतदारांची मोठ्या प्रमाणावर होत असलेली नाराजी, गेवराई विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या संख्येने उभा राहिलेले ओबीसी समाजातील उमेदवार, त्यामुळे ओबीसी मतांची होणारी विभागणी या पार्श्वभुमीवर विजयसिंह पंडित यांनी विधानसभेची निवडणुक अपक्ष लढवावी यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे. मागील दोन दिवस सुरु असलेल्या प्रचार दौर्यात आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून यासाठी विजयसिंह पंडित यांच्यावर दबाव आणला जात आहे. आज झालेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या बैठकीमध्ये अमरसिंह पंडित यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला जाईल असे सूचक विधान केल्यामुळे गेवराईच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विजयसिंह पंडित यांनी बाजी मारली, लाडक्या बहिणींना सोबत घेवून अनोख्या पध्दतीने त्यांनी अतिशय साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचारातही माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या सुत्रबध्द नियोजनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची फळी कामाला लागल्याचे दिसते. युवा पिढीमध्ये रणवीर आणि पृथ्वीराज पंडित यांनी रान उठवून दिले आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील मराठा, अल्पसंख्यांक आणि दलित कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी बैठका घेवून अमरसिंह पंडित यांच्याकडे ही निवडणुक अपक्ष लढण्यासाठी आग्रह धरला आहे. कृष्णाई येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज अमरसिंह पंडित यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर होईल असे सूचक वक्तव्य केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीला नवीन वळण मिळते काय ? याची चर्चा सध्या गेवराई शहरात सुरु आहे.
गेवराई विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर रंजक किस्से घडत आहेत. विद्यमान आमदारांनी भाजपा सोडून तुतारी हाती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले, परंतु जागा वाटपाच्या प्रक्रियेत त्यांना तिकिट न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी मेळावा घेवून अपक्ष लढण्याचा निर्णय जाहिर केला. चकलांब्याच्या सरपंच प्रियंका खेडकर यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहिर झाली असून मयुरी खेडकर यांना सुध्दा मनसेकडून उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. हे दोन्ही उमेदवार राजकीयदृष्ट्या मुंडे कुटूंबियांशी संबंधित असल्याचे प्रचारात भासविण्यात येत आहे, त्यामुळे ओबीसी मतांची मोठी विभागणी होणार असल्याची चर्चा गेवराई विधानसभा मतदार संघात आहे. आ.लक्ष्मण पवार यांनी भाजपा सोडल्यानंतर प्रा.पी.टी.चव्हाण हे भाजपाच्या उमेदवारीसाठी आग्रही होते, महायुतीकडून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांनी सुध्दा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत. दुसरीकडे मनोज पाटील जरांगे यांचेकडून महेश दाभाडे, बप्पासाहेब तळेकर, ऋषिकेश बेदरे, पुजा मोरे यांच्यासह अनेक प्रभावी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दाखल होताना दिसत आहेत.