पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ घडली आज सकाळी घटना
बीड (रिपोर्टर): नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणार्या चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले तर चौघे जण जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की, एका मयताचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. ही दुर्दैवी घटना आज सकाळी सहा वाजता पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सय्यद हमीद (वय 70 वर्षे रा. मुंबई) यांच्या नातेवाईकाचे 10 नोव्हेंबर रोजी बीड येथे लग्न होते. या लग्नानिमित्त ते आपल्या कुटुंबियासमवेत चारचाकी गाडीने बीडकडे येत होते. सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान पाडळसिंगी टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात सय्यद हमीद (वय 70 वर्षे) व त्यांचा मुलगा सय्यद मुदस्सीर (वय 35 वर्षे, रा. अंधेरी, मुंबई) हे दोघे जागीच ठार झाले तर गाडीतील अन्य चार जण जखमी झाले. त्यामध्ये दोन लहान मुलांचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की, गाडी चक्काचूर झाली होती. त्यातील एका मयताचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल बीड शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.