मुंबई (रिपोर्टर): मुंबईत आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एक मुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिसतोय. देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी निवड झाल्याबद्दल मराठवाड्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी फडणवीसांवर अभिनंदनचा वर्षाव केलाय. देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत पंकजा मुंडे आता आमचा मूड चांगला आहे असं म्हणाल्या. तर आशिष शेलार यांनी आमच्यासाठी आज दिवाळी असल्याचं म्हणत
फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात.
या वेळी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीसांचा अनुभव फार महत्वाचा ठरेल. देवेंद्रजी यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे, त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्वाचा ठरेल. आता आमचा मूड चांगलाय.
भागवत कराड
उद्या गटनेतेपदी निवड झाल्याने फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राला विकसित राज्य बनवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज होती. महाराष्ट्रातल्या जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न ते ओळखतात. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन. पाच वर्ष त्यांचं सरकार पाहिलं आहे. आताही जनतेला विश्वास आहे. मी मंत्रीपदाच्या कोणत्याही शर्यतीत नाही. आता नाव असणारच. आमचं लक्षच नाही त्याकडे. आम्हाला आता फक्त मिळालेलं बहुमत, सन्मान यातच आम्ही खूष आहेात. कोणत्या खात्यावर यायला आवडेल याचा विचार तेंव्हाही केला नाही, आताही करत नाही.