बीड (रिपोर्टर): महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अकरा दिवसांनी आज महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे फडणवीस होणार यावर शिक्कामोर्तब झाला. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सितारामण यांच्या नेतृत्वात पक्षाची बैठक झाली. आज दुपारी महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापण्याचा दावा करतील. उद्या 5 डिसेंबर सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान येथे मुख्यमंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा होईल. या सोहळ्यात दोन उपमुख्यमंत्र्यांनाही शपथ देण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती राहणार आहे. फडणविसांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात ‘मी पुन्हा आलो’, च्या मिम्सने जल्लोष साजरा केल्याचे दिसून येते.
विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी आज भाजपाचे केेंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सितारामण यांच्या उपस्थितीत भाजपाच्या नेत्यांची महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळ नेतेपदासाठी देवेंद्र सरीताताई गंगाधर फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे यांच्यासह अन्य आमदारांनी अनुमोदन दिले. त्यावेळी एकमताने विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी फडणविसांचे स्वागत केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची निश्चिती झाल्याचे स्पष्ट झाले. आज दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे तीन नेते एका शिष्टमंडळासह राज्यपालांना भेटतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील. उद्या 5 वाजता आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणविसांचा शपथविधी होईल. या वेळी अन्य दोन उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाईल. फडणविसांच्या नावाची घोषणा होताच शपथविधी सोहळ्याची पत्रिकाही तात्काळ मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी काढली.
मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही 2019 ची देवेंद्र फडणविसांची आत्मविश्वासू घोषणाची मध्यंतरी बरीच खिल्ली उडविण्यात आली. यादरम्यान फडणवीस यांच्या विरोधात प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले. त्यावर फडणविसांनी भाष्य केले नाही. शांत राहणे पसंत केले. अखेर आज त्यांची विधीमंडळ नेतेपदी घोषणा झाली आणि फडणवीस यांच्या त्या ‘मी पुन्हा येणार’ या वक्तव्याला ‘मी पुन्हा आलो’ च्या मिम्सचा सोशल मिडियावर पाऊस पडला.
फडणवीस म्हणाले, एक है तो सेफ है
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर गेल्या जवळपास आठ दिवसांपासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट होत नव्हतं. मात्र, अखेर आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट झालं आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची गटनेता निवडीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी एकमताने निवड केली. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह काही राज्याचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांचे आणि जनतेचे आभार मानले. तसेच आमदारांना संबोधित करत असताना एक है तो सेफ है असा नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.