शेख मजीद
बीड ः बीड जिल्ह्यामध्ये फळबागांचे क्षेत्र वाढू लागले.शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत फळ पिके लागवड करू लागले. शासनाच्या माध्यमातून फळबाग लावणार्या शेतकर्यास आर्थिक मदत दिली जाते. बीड जिल्हा दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे बीडची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणूनही आहे. अशा बीडमध्ये गेल्या काही वर्षापासून शेतीत बदल होवू लागला. फळबागांची लागवड करून शेतकरी चांगले आर्थिक उत्पन्न घेवू लागले. गेल्यावर्षी 238 हेक्टरमध्ये मोसंबीची तर 130 हेक्टरमध्ये आंब्यांची लागवड झाली. जिल्ह्यात एकूण मोसंबीचे क्षेत्र 3705.50 हेक्टर तर आंब्यांचे 2104.75 हजार हेक्टर आहे. इतरही फळपिकांची लागवड झालेली आहे.
बीड जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. जिल्ह्यातली शेती 80 टक्के पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जिल्ह्यात सतत दुष्काळी परिस्थिती असते. ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणूनही बीडची ओळख आहे. अशा दुष्काळी जिल्ह्यातील शेतकरी आपली शेती समृध्द करण्याचा प्रयत्न करू लागले. पारंपारिक पिका ऐवजी फळ पिकांची लागवड करून त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न घेवू लागले. दिवसेंदिवस फळबागाचे क्षेत्र वाढू लागले. फळबाग लावणार्या शेतकर्यांना कृषी विभागाच्या वतीने आर्थिक मदतही दिली जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत शेतकर्यांना हेक्टरी अनुदान मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये मोसंबीची सर्वाधिक 3705.50 हेक्टरमध्ये लागवड आहे. त्या खालोखाल 2104.75 हेक्टरमध्ये आंब्यांची लागवड करण्यात आली. इतरही फळपिकांची लागवड जिल्ह्यात झालेली आहे.
कोणत्या फळ झाडाला किती अनुदान
आंबा-हेक्टरी 1 लाख 69 हजार 640, मोसंबी-1 लाख 62 हजार 103, कागदी लिंबू-1 लाख 12 हजार 104, चिंच (विकसित जाती)-1 लाख 63 हजार 50, नारळ रोपे (टी.डी)-1 लाख 11 हजार 264, संत्रा-2 लाख 15 हजार 806, डाळींब-2 लाख 47 हजार 895, चिकू-1 लाख 66 हजार 304 रूपये इत्यादी अनुदान मिळत आहे. हे अनुदान रोजगार हमी योजने अंतर्गत मिळते.