नवी दिल्ली (वृत्तसेवा): संसद परिसरात अमित शाह यांनी केलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलच्या वक्तव्यावरून आज जोरदार राडा झाला आहे. राहुल गांधी व त्यांच्या खासदारांना संसदेत जाण्यापासून अडविण्याचा प्रयत्न करणार्या खासदारांना राहुल गांधी यांनी धक्का दिल्याने भाजपाचे दोन खासदार जखमी झाले आहेत. भाजपा खासदार प्रताप सारंगी हे खाली पडल्याने जखमी झाले आहेत. राहुल गांधींनी आंदोलन करणार्या प्रियांका गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांना भाजप खासदार वाईट वागणूक देत होते, मला संसदेत जाण्यापासून रोखत होते, असा आरोप केला आहे. आता भाजपा राहुल गांधी यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची तयारी करत आहे.
प्रताप सारंगी व अन्य एका भाजप खासदाराला दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांचा धिक्कार केला आहे.
मी राहुल गांधी यांना विचारू इच्छितो की, संसद ही काय शारीरिक दाकद दाखविण्याची जागा आहे का? जर सर्व लोक आपली ताकद दाखवायला लागले तर संसद कशी चालेल, पैलवानी दाखविण्याचा अर्थ काय आहे, ही कराटे, कुंगफू खेळायची जागा नाही की कोणा राजाची खासगी संपत्ती नाही. लोकशाहीचे मंदिर आहे. संसद काही कुस्तीचे मैदान नाही, बॉक्सिंगचा आखाडा नाही, अशा शब्दांत रिजिजू यांनी फटकारले आहे.
या धक्काबुक्कीनंतर भाजपा आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या धक्काबुक्कीचे व्हिडीओ शोधले जात आहेत. धक्का दिल्याचा आरोप तपासून जर व्हिडीओत तसे आढळले तर भाजपा राहुल गांधी यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांनी आजतकला सांगितले आहे. सारंगी यांनी आपण संसदेच्या पायर्यांवर बाजुला उभे होतो, असे सांगितले आगे. तर राहुल गांधी यांनी हे आरोप फेटाळत संसदेत जात असताना भाजपाच्या खासदारांनी मला ढकलले आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच खर्गे यांनाही धक्का दिल्याचे म्हटले आहे. धक्काबुक्की केल्याने आम्हाला काही होत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच कॅमेर्यामध्ये सारे कैद झाले आहे, असेही ते म्हणाले आहेत.