नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
गेवराई (भागवत जाधव) : पैठण येथील जायकवाडी धरणातून मंगळवारी पाणी नदीपात्रात सोडल्याने गेवराई तालुक्यातील पंचाळेश्वर येथील तीर्थक्षेत्र भगवान दत्तात्रयांचे भोजनस्थान आत्मतीर्थ हे पाण्यात बुडाले आसून तीर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनी मंदिरांसह महाराजांची मूर्ती पाण्यात बुडाली असल्याने भाविकांसाठी येथील दर्शन बंद करण्यात आले आहे. तर आज सकाळी पुन्हा विसर्ग वाढवून 30 हजार क्यूसेकने पाणी पात्रात सोडण्यात आल्याने गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.
पैठण नाथसागर जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून जायकवाडी धरण हे जवळपास 92 टक्के भरले असल्याने मंगळवारी धरणाचे 10 ते 27, असे एकूण 18 दरवाजे दीड फुटाने उघडून जलविद्युत केंद्रांमधून 1 हजार 589 क्युसेक , तर धरण सांडव्यामधून 18 हजार 864 क्युसेक असे मिळून 20 हजार 453 क्युसेकने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडले होते. मात्र वरतून येणार्या पाण्याची आवक पाहता आज सकाळी पुन्हा दरवाजे दीड फुटाणे वर घेऊन जवळपास 30 हजार क्यूसेकने विसर्ग वाढवण्यात आल्याने असून गोदावरी दुथडी वाहत आहे. दरम्यान हे पाणी आज बुधवार रोजी पहाटे गेवराई तालुक्यातून जाणा-या गोदावरी नदी पाञात दाखल झाले असून पंचाळेश्वर येथील सुप्रसिद्ध श्री.दत्त भोजन स्थान मंदिर हे पाण्याखाली गेले आहे. तर राक्षसभुवन येथील शनिमूर्ती व मंदिर ही पाण्यात गेले आहे. तर नाथसागरात पाण्याची आवक सुरूच असल्याने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग आणखी वाढू शकतो असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. गोदावरीत पाण्याचा विसर्ग होताच गोदाकाठावरील नागरिकांना दवंडीद्वारे सतर्कतेचा इशारा गेवराई तहसील प्रशासनाकडून देण्यात आला असून तहसीलदार सचिन खाडे यांनी अनेक गावांना भेटी देऊन तेथील सरपंच, पोलिस पाटील तसेच महसूल अधिकारी, कर्मचार्यांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान पांचाळेश्वर येथील दत्त भोजन स्थान मंदिरासह नदी पाञात असलेली छोटी मंदिरे पूर्ण पाण्याखाली गेली आसून राक्षसभुवन येथील शनी मुर्तीसह मंदिरही पाण्याखाली गेले आहे.
नाथसागरातून पाणी सोडण्यात आले असले तरी गोदावरी नदीवरील बंधारे यापूर्वीच भरले असल्याने गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे गोदाकाठावरील आपापल्या गावांत दवंडीद्वारे गोदावरी नदीकाठच्या नागरीकांना, शेतकर्यांना आदेश देऊन कोणतीही जीवित, वित्तहाणी होणार नाही याची वेळोवेळी खबरदारी घेतली जात आसून नागरिकांनी सतर्क राहून वेळोवेळी प्रशासनाला माहिती द्यावी.
– सचिन खाडे
तहसीलदार, गेवराई