अध्यक्ष म्हणाले, तो सरकारचा अधिकार
जग अवकाशात जातय, आम्ही कबरी खोदतोय -जयंत पाटलांचा सरकारवर खोचक टोला
मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्यांनी गाजत आहे. आज पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत एक शासकीय ठराव मांडत केंद्र सरकारने जलप्रदुषण आणि पर्यावरण संदर्भात आणलेला कायदा जशाचा तसा महाराष्ट्रात लागू करणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जग अवकाशात पोहचले अन् आपण कबरीच्या मागे लागलो आहोत, असा खोचक टोला सत्ताधार्यांना लगावला. विधानसभेमध्ये आज मुंबईच्या रस्त्याचा प्रश्न प्रचंड गाजला तर काँग्रेसच्या महिला आमदाराने टी शर्ट घालून सरकारविरोधात आंदोलन केले. टी शर्टवर सरकारचा उल्लेख ‘अदानी सरकार’ म्हणून केल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. विविध मुद्यांनी हे अधिवेशन गाजत आहे. कधी औरंगजेबाची कबर तर कधी नागपूर दंगल यावरून प्रचंड गदारोळ कालपर्यंत पहायला मिळाला. आज सकाळी जेव्हा विधीमंडळाचे कामकाज सुरू झाले तेव्हा काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांनी टी शर्ट घालून विधीमंडळ परिसरामध्ये सरकारविरोधात आंदोलन केले. त्यांच्या टी शर्टवर सरकारला चार प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये 40 टक्के सर्वेक्षण झाले नाही मग मास्टर प्लान तयार कसा? मास्टर प्लानवर लोकांचा अभिप्राय नको, अदानींना धारावीच्या सहापट जागा, धारावीकरांना बाहेरचा रस्ता, हा तर विनाश. विरोध केला तर बेदखल करणार, असा तुघलकी जीआर तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेमध्ये एक ठराव मांडला. केेंद्र सरकारने जलप्रदूषण आणि पर्यावरण संदर्भात आणलेला कायदा जश्याचा तसा महाराष्ट्रात लागू करणार असल्याचे सांगितले. मात्र प्रत्येक राज्याची आणि जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे. केंद्राचा कायदा महाराष्ट्रात जशास तसा नको, विधेयक विधीमंडळात आणावे, त्यावर चर्चा व्हावी त्यानंतर हा कायदा लागू केला जावा, अशी मागणी विरोधी पक्षाचे भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, संजय कुटे, आदित्य ठाकरे यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री महोदयांनी मांडलेला ठराव नियमबाह्य नाही, तसे अधिकार आर्टीकल 252 नुसार राज्य सरकारला असल्याचे सांगितले. सोबतच ठराव मंजूर केला आहे, यावर कोणाला काही सूचना द्यायच्या असतील तर द्याव्यात, चांगल्या सूचनांचा विचार केला जाईल, असे म्हटले. इकडे जयंत पाटलांनी सरकारला एका विषयात धारेवर धरले. जेव्हा विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा पार पडली त्यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवत जोरदार निशाना साधला. बाहेरच्या देशांनी सुनिता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणले, जग अवकाशात पोहचले आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत, असा खोचक टोलात त्यांनी या वेळी सरकारला मारला. आज विधान परिषदेचे नवनिर्वाचीत आमदार चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केणेकर, संजय खोडके, संदीप जोशी या पाच सदस्यांना आमदारकीची शपथ देण्यात आली.