अंबाजोगाई : तालुक्यातील तळेगाव घाटशिवारात विहिरीचे काम सुरू होते. या कामावर ब्लास्टिंग करताना जिलेटिनचा स्फोट झाल्याने एक कामगार १० फूट विहिरीच्या बाहेर येऊन परत विहिरीत पडल्याने जागीच मृत्यू पावला. अन्य तिघेजण जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर एकावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी सकाळी ११:३० वाजता घडली.
अंबाजोगाई तालुक्यातील तळेगाव घाट तांडा शिवारात उत्तम पांडुरंग आडे यांना शासनाची वैयक्तिक जलसिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहिरीचे काम सुरू असताना मंगळवारी या विहिरीमध्ये जिलेटिनचे स्फोट घेण्यात आले. उर्वरित कामकाज सुरू असताना सकाळी ११:३० च्या सुमारास विहिरीतील जिलेटिनचा स्फोट झाल्याने धनराज अनंत दहीफळे (रा. खोडवा सावरगांव, ता. परळी) हा मजूर विहिरीच्या बाहेर १० फूट उंच उडून परत विहिरीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पिंटू विठ्ठल दहीफळे, जीवन हरिश्चंद्र दहिफळे, भारत तुकाराम पवार हे गंभीररीत्या जखमी झाले.