महसूल विभागही पावती-पुस्तक घेवून गावपातळीवर
बीड, (रिपोर्टर)ः-मार्च एन्डला हिशोक असतो. सर्व कार्यालयाने आप आपला वर्षाचा हिशोब द्यावयाचा असतो. जास्तीत जास्त महसूल वसूल करावा असा शासनाचा आदेश असतो. वर्षेभर महसूल गोळा न करता मार्च महिन्यामध्ये वसूलीवर भर दिला जातो. अनेक गावातील नागरीकांकडे विजेचे बिल थकीत असते. हे बिल वसूल करण्यासाठी विज कर्मचारी घरोघरी जात असल्याचे दिसून येत आहे तर महसूल विभागाचे कर्मचारी देखिल पावती पुस्तक घेवून गाव पातळीवर महसूल वसूल करतांना पहावयास मिळत आहेत.
राज्य आणि केंद्र सरकारला विविध विभागाच्या माध्यमातून महसूल मिळत असतो. हा महसुल नियमितपणे वसूल करण्याचे आदेश संबंधित विभागाला असते. मार्च एन्डला हिशोबाचा लेखाजोखा असतो. वर्षेभरात किती वसूली झाली यासह इतर हिशोब द्यावा लागत असतो. महसूल, विज वितरण कंपनी या कार्यालयामार्फत कोट्यावधीचा महसूल जमा होत असतो. गाव पातळीसह शहरातील हजारो नागरीकांकडे विजेचे थकीत बिल आहे. हे थकीत असलेले बिल मार्च एन्डला वसूल करण्यासाठी कर्मचारी गावोगावी फिरू लागले. ज्यांचे जास्त थकीत बिल आहे त्यांनी बिल भरले नाही तर त्यांचे कनेक्शन तोडले जात आहे तसेच महसूल विभागाने देखिल आपल्या मंडळ परिसरात वसूलीला सुरूवात केली. तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांनी या आठवड्यात वसूलीकडे जातीने लक्ष दिले आहे. महसूल गोळा करण्यासाठी कर्मचारी पावती पुस्तक घेवून ग्रामीण भागात दिसून येत आहेत. गौण खनिजासह इतर विभागाच्या माध्यमातूनही वसूलीवर जोर देण्यात आला आहे.