पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटले
नेकनूर (रिपोर्टर): शेतकर्याला मावेजा न देता रेनिओ कंपनी दादागिगरी करत शेतामध्ये उभ्या पिकात घुसखोरी करत विद्युत तार ओढून नुकसान करत आहे. जोपर्यंत मावेजा मिळत नाही तोपर्यंत विद्युत तार ओढू देऊ नये, अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकार्यांना दिचल्यानंतरही आज रेनिओ कंपनीकडून दादागिरी करत तार ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा शेतकर्याने आक्रमक होत त्याला विरोध करत पोलवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नेकनूर पोलिसांनी हस्तक्षेप करत कंपनी व शेतकर्यांना सामंजस्याने सदरचे प्रकरण हाताळण्याबाबत सूचना केली तेव्हा कंपनीकडून मावेजा देण्याचे मान्य करण्यात आले. सदरचा प्रकार हा आज दुपारी बोरखेड येथे घडला.

नेकनूरपासून जवळ असलेल्या नसीर तुराबखाँ पठाण या शेतकर्याने 20 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्यांना एक निवेदन देऊन आमच्या शेतात पिकाचे व जमिनीचे आणि शेतातील झाडांचे मोठ्या प्रमाणावर रेनिओ कंपनीने नुकसान केले आहे. गट क्र. 563 व गट. क्र. 570 या जमीनीतून उच्चदाब विद्युत तार ओढण्याचे काम कंपनी बळजबरीने करत आहे. त्याचबरोबर काळकुटे नामक व्यक्ती हा त्यांना मदत करत आहे. आमच्या परवानगीशिवाय आणि आम्हाला मावेजा दिल्याशिवाय विद्युत वाहिनी तार आमच्या जमीनीतून ओढू नये, अशा आशयाची मागणी केली होती. मात्र आज शेतकर्यांच्या या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि कंपनीचे अधिकारी जेव्हा तार ओढू लागले तेव्हा आक्रमक झालेल्या पठाण कुटुंबियांनी कंपनीच्या अधिकार्यांना विरोध केला. एकाने विजेच्या खांबावर चढण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी नेकनूर पोलीस डेरेदाखल झाली. त्यांनी कंपनी अधिकार्यांना आणि शेतकर्यांना सदरचे प्रकरण सामंजस्याने मिटवण्याचे सांगितले. शेवटी कंपनीने शेतकर्यांना मावेजा देण्याचे आश्वासित केले तेव्हा सदरचे आंदोलन शेतकर्यांनी मागे घेतले. बीड जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेल्या कंपन्या आणि त्या कंपन्यांच्या अधिकार्यांनी हाताखाली घेतलेले हस्तक शेतकर्यांना दाबदडप करत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोसावी यांनी या प्रकरणी अधिक लक्ष घातल्याचे सांगण्यात येते.