कोल्हापूर: ऑनलाईन रिपोर्टर
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर न्यायालयात हल्ला झाला आहे. एका वकिलानं कोरटकरवर हल्ला केला. अमित भोसले असं वकिलाचं नाव आहे. न्यायालयातील युक्तिवाद संपल्यानंतर पोलीस कोरटकरला कोठडीकडे नेत होते. त्यावेळी वकील अमित भोसले यांनी कोटकरवर हल्ला केला. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का, असा सवाल करत वकिलानं कोरटकरवर झडप घातली.
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी पोलिसांना जवळपास महिना लागला. कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. बुधवारी न्यायालयाच्या आवारातच कोरटकरवर शिवप्रेमींनी हल्ला केला. त्यावेळी तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. मात्र त्याही परिस्थितीत शिवप्रेमींनी कोरटकरवर हल्ला केला. दोनच दिवसांपूर्वी हल्ल्याची घटना घडल्यानं आज पोलीस सतर्क होते. मात्र तरीही कोरटकरवर हल्ला झाला आहे.
आज न्यायालयात ४० ते ४५ मिनिटं युक्तिवाद झाला. त्यानंतर कोरटकर न्यायालयातच होता. न्यायमूर्तींच्या आदेशाची वाट पाहत तो न्यायालयातच थांबला होता. न्यायाधीशांनी त्याची पोलीस कोठडी २ दिवसांनी वाढवली. यानंतर पोलीस त्याला घेऊन गेले. न्यायालयाच्या मागच्या दारानं त्याला बाहेर नेलं जात होतं. त्यावेळी एका वकिलानं कोरटकरवर हल्ला केला.
सुनावणी असल्यानं पोलिसांनी न्यायालयात बाहेरील व्यक्तींना सोडलं होतं. हल्ला टाळण्यासाठी पोलिसांनी बाहेरील वाहनंही न्यायालय परिसरात येऊ दिली नव्हती. कोरटकरवर हल्ला करणारा अमित भोसले वकील असल्यानं पोलिसांना त्याच्यावर शंका आली नाही. पोलीस मागील दारानं कोरटकरला नेत असताना वकील भोसलेंनी त्याच्यावर झडप घालत हल्ला केला.
न्यायालयाचा मागील दरवाजा कँटिनच्या दिशेनं उघडतो. तिथे वकील अमित भोसले आधीपासूनच उभे होते. कोरटकर दिसताच त्यांनी त्याला हाक मारली. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का? असा सवाल विचारत भोसले कोरटकरवर धावून गेले. त्यांनी कोरटकरवर झडप घातली. पोलिसांनी त्यांना दूर केलं. गेल्या ३ दिवसांत कोरटकरवर २ हल्ले झाले आहेत. त्यामुळे आता पुढील सुनावणीवेळी पोलिसांची अग्नीपरिक्षा असेल.