अंबाजोगाई, (रिपोर्टर) ः बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून रोज कुठे ना कुठे खून, दरोडे, हल्ल्यासारखे गंभीर घटनांना अंजाम देणारे गुन्हेगारी मानसिकतेचे लोक घटना घडवून आणतात, आज अंबाजोगाई शहरातल्या पोखरी रोडवर सारडा नगरी जवळ अज्ञात दोन तरुणांनी 30 वर्षाच्या राजकुमार करडे या इसमावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी असून त्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहे, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्या कुणालाही अटक केली नाही, मात्र पोलिस रुग्णालयात तळ ठोकून आहेत.
याबाबत अधिक असे की, अंबाजोगाई शहरातील गवळीपुरा भागात राहणारे राजकुमार साहेबराव करडे हे शहरातील पोखरी रोडवरून मोटारसायकलने जात होते. त्यांची गाडी सारडा नगरीजवळ आली त्यावेळी अचानक दोन तरुण त्यांच्या गाडीसमोर आले. तरुणांनी अचानक राजकुमार करडे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. काही कळ्याअगोदरच दोघांनीही सपासप वार केल्याने करडे हे रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी कोसळले. सदरचा प्रकार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. उपस्थितांनी करडे यांना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. या प्रकरणी आम्ही पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा अंबाजोगाई पोलिसांनी या प्रकरणी अद्याप आमच्याकडे कुठलीही माहिती उपलब्ध नाही, पीआय घोळवे हे रुग्णालयात गेले असल्याचे सांगितले. भर सकाळी अंबाजोगाईत तरुणावर हल्ला झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.