माजलगाव – ऑनलाईन रिपोर्टर
बीड जिल्ह्यातून आज पुन्हा एकदा खळबळजनक बातमी समोर येत आहे. भाजपाचे माजलगाव तालुका सरचिटणीस बाबासहेब आगे यांची भाजपाच्या कार्यालयाबाहेर सत्तुरने वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना आज दुपारी दिड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मारेकर्यांनी हत्या केल्यानंतर स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेने माजलगाव शहरात आणि बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा उडाल्याचे अनेक घटनाक्रमावरून दिसून येत आहे. एकीकडे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नवनित काँवत प्रयत्नांची परीकाष्टा करत असताना जिल्ह्यात गंभीर गुन्हे पुन्हा पुन्हा घडताना दिसून येत आहेत. माजलगाव तालुका भाजपाचे सरचिटणीस बाबासहेब आगे (रा.किट्टीआडगाव) हे आज दुपारी माजलगाव शहरातल्या शाहूनगर भागात असलेल्या भाजपाच्या कार्यालयात गेले होते. तिथले काम आटोपून ते कार्यालयाबाहेर पडले. त्याचवेळी बाबासाहेब आगे यांची हत्या करण्याच्या उद्देशाने दडून बसलेला नारायण फपाळ हा त्यांच्यासमोर आला. आणि त्यांच्यावर सत्तूरने वार करत सुटला. अचानक झालेल्या हल्ल्यात बाबासाहेब आगे हे खाली कोसळले मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या माजलगाव शहरात हत्येची घटना घडल्याने माजलगावमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सदरची हत्या ही अनैतिक संबंधातून घडल्याचे सांगण्यात येते. मारेकरी असलेला नारायण फपाळ याची सासरवाडी ही किट्टी आडगाव आहे. मयत बाबासाहेब आगे हे किट्टी आडगावचे आहेत. हत्या केल्यानंतर आरोपी पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.