परळी (रिपोर्टर): अखंड हरिनाम सप्ताहाच्या जेवणाच्या पंगतीवरून झालेल्या वादातून तरुणास उचलून नेत टोकवाडीतल्या रत्नेश्वर मंदिर परिसरात बेदम मारहाण करणार्या 20 जणांविरोधात परळीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. सदरच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

याबाबत अधिक असे की, परळी तालुक्यातील जलालपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या ठिकाणी शिवराज दिवटे व काही तरुणांचा वाद झाला. हा तरुण जेव्हा अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाहून परतत असताना काही तरुणांनी त्याला परळी परिसरातून उचलून नेत अपहरण केले व थेट त्याला टोकवाडीतील रत्नेश्वर मंदिर परिसरात घेऊन गेले. त्याठिकाणी त्याला लाठ्या-काठ्या, रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरलही केला. त्यानंतर परळी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. या मारहाणीत शिवराज दिवटे हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहीत मुंडे, आदित्य गिते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, संमित्र शिंदे, गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज गिते यांच्यासह अनोळखी 10 असे एकूण 20 जणांविरोधात बी.एन.एस. कलम 109, 126 (2), 140 (3), 118 (1), 189 (2), 189 (4), 190, 191 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तेलगाव येथून चौघांना तर अन्य तिघांना परळी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रकरणाला जातीय रंग देऊ नका
एसपी नवनीत काँवत यांचे आवाहन
परळीतील मारहाणीचा व्हिडिओ व्हायर झाल्यानंतर पोलिसांनी पिडिताची भेट घेतली. घटनेबाबत त्याच्याकडून माहिती घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पिडित दिवटे याने दहा लोकांचे नाव सांगितले आणि अज्ञात दहा लोक असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणी आम्ही आरोपीविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये मराठ, वंजारा, गोसावी यासह अन्य जातीचे लोक आहेत. हे प्रकरण जातीयवादातून घडलेलं नाही, कृपया या प्रकरणाला जातीय रंग कोणीही देऊ नये, असे आवाहन पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे.