सत्कार समारंभाऐवजी कारभार चालवा -अजित पवार
मुंबई (रिपोर्टर) बीडमध्ये गोगलगाईमुळे पीक गेले, शेतकरी उद्ध्वस्त झाला, मराठवाड्यासह विदर्भ आणि अन्य भागांमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. शेतकर्याचं गोधन वाहून गेलं, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. शेतकरी प्रचंड अडचणीत असताना त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यमंत्री ठिकठिकाणी सत्कार स्वीकारण्यात व्यवस्त आहेत. अजून पंचनामे पुर्ण झालेले नाहीत, ते कधी होणार? हे सांगायला कोणी तयार नाही. असे सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार आज कडाडले. राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला नाही, हे कशात अडकले, त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळाले नाहीत का? की जास्त आमदारांना मंत्रिपदाची प्रलोभने दिली हे कळायला मार्ग नाही. सर्व खातींची अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच आहेत, उपमुख्यमंत्री अधिकार नाहीत, आज सर्व फाईली मंत्रालयात तुंबल्या आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
ते पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि पुराने शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यमंत्री ठिकठिकाणी सत्कार स्वीकारण्यास व्यस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत याबाबत कधी होणार याबाबत कोणीच सांगत नाही. पूरग्रस्त भागात केलेल्या पाहणी दौर्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना लोकांच्या समस्येबाबत पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकताच पूरग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यानंतर मुंबईत अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांनी सांगितले की, मराठवाड्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. परंतु अजूनही सरकारी मदत मिळालेली नाही. बीडमध्ये गोगलगायमुळे पीक गेले आहे. यामध्ये काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. सुरुवातीला काही भागात मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनी दौरा केला. मात्र, त्यानंतर लक्ष दिलं नाही. खरंतर केंद्राच्या पाहणी पथकाला बोलवायला हवं होतं. मात्र अजूनही तसं केले नसल्याचे पवार यांनी सांगितले.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत आणि मुख्यमंत्री गावोगावी सत्कार सोहळे स्वीकारत आहेत अशी टीका अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री सध्या अनेकांना भेटत आहेत. सध्या शेतकर्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे. याकडे लक्ष द्यायला हवं. तिथ लक्ष देणार्या पालकमंत्र्यांच्या नेमणुका त्यांनी अजून केलेल्या नाहीत, असेही पवार यांनी सांगितले. राज्याचा इतर भागात अतिवृष्टी झालेली आहेत. तिथं देखील मदत द्यायला हवी. सध्या पीक विम्याचा प्रश्न आहे. अजूनही त्याबाबत निर्णय झालेला नाही. शैक्षणिक शुल्क माफ करण्याची आवश्यकता आहे. मात्र, अजूनही त्यावर निर्णय घेतला गेला नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
हेक्टरी 75 हजारांची मदत द्या – अजित पवार
राज्यात काही दिवसांपू्र्वी कोसळलेल्या पावसामुळे अनेक शेतकर्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. यामुळे शेतकर्यांचे आणि सामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने त्वरीत नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करून मदत देण्याची तसेच नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी 75 हजारांची मदत देण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीच नियमांचे पालन करत नसल्यावरही नाराजी व्यक्त केली.उपमुख्यमंत्र्यांना अधिकारच नाही
शपथविधी होऊन एक महिना झाला मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. अजूनही उपमुख्यमंत्र्यांना सह्यांचे अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक फाईल ही मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. बर्याच फाईल अजूनही थांबलेल्या आहेत. त्यामुळे अनेक काम थांबली असून जनतेची कामे खोळंबली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.