अवचर दाम्पत्याला मारहाण करत नऊ लाखांची रोकड, लाखोंचे सोने लुटले
दरोडेखोरांच्या मारहाणीत अवचर जखमी
घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी डेरेदाखल
श्वानपथकालाही केले पाचारण
अमजद पठाण । नेकनूर
बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष अभिमान अवचर यांच्या निवासस्थानी आज पहाटे अज्ञात आठ ते दहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत अवचर दाम्पत्याला बेदम मारहाण करत घरामधील नगदी नऊ लाख रुपये, पत्नीच्या अंगावरील आणि अभिमान अवचर यांच्या गळ्यातील चैन असे पाच तोळे सोने लुटून नेल्याची खळबळजनक घटना नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या वडवाडी गावात घडली. या घटनेने तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी भेट दिली आहे. घरामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाची पाहणी करत श्वान पथकाला पाचारण केल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांच्या मागावर काही पथके पाठवल्याचे सांगण्यात येते.
बीड तालुक्यातील बोरखेडजवळ असलेल्या वडवाडी येथे अभिमान शाहुराव अवचर यांचे बळीराजा कृषी विज्ञान मंडळ आहे. या अंतर्गत ते शेतकर्यांच्या शेतीमालाची खरेदी-विक्री करत असतात. आपल्या निवासस्थानी रात्री अभिमान अवचार व त्यांच्या पत्नी सत्वशिला अभिमान अवचर यांनी जेवण करून झोपल्या असता पहाटे चार ते साडे चार वाजण्याच्या दरम्यान आठ ते दहा दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश केला. या वेळी अवचर कुटुंबीयांना दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवला. अभिमान अवचार यांच्यासह त्यांच्या पत्नी सत्वशीला अवचार यांना मारहाण करत सत्वशीला यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे दागिने तर अभिमान यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची चैन, हातामधील अंगठी जबरदस्तीने हिसकावून घेतली. शेतकर्याचे हरभरे खरेदी करण्यापोटी शेतकर्यांना देण्यासाठी आणलेले ९ लाख रुपयेही अज्ञात दरोडेखोरांनी लुटून नेले. तब्बल दीड ते दोन तास दरोडेखोर अवचर यांच्या निवासस्थानी धुमाकूळ घालत होते. घरामधील प्रत्येक खोलीत त्यांनी एक ना एक वस्तू तपासून पाहितली. कपडे अस्ताव्यस्त केले. कपाटाचे लॉक तोडले, सुटकेस फोडल्या, ड्राव्हरमधील साहित्य खाली टाकल्या. घरामधील अन्य किमती वस्तूही दरोडेखोरांनी लुटून नेल्या. या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर घटनास्थळी नेकनूर पोलिस फौजफाट्यासह डेरेदाखल झाले. गुन्हे अन्वेषण विभागासह वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरोडेखोरांनी पती-पत्नीला मारहाण करून लुट केल्याची माहिती परिसरात पसरल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.