१५ ब्रास वाळू जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणून टाकली
ज्यांनी वाळू माफियांना रस्ते दिले त्यांची चौकशी होणार
बीड/कुक्कडगाव (रिपोर्टर)- वाळु उपसण्याच्या कारणावरून काल सिंदफणा नदी पात्रात हाणामारीची घटना घडली. याची दखल महसूल आणि पोलिस प्रशासनाने घेतली. नदी पात्रातील दोनशे ब्रास वाळू सील करून १५ ब्रास वाळू जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणून टाकली आहे. येथील काही शेतकर्यांनी वाळू माफियांना आपल्या शेतातून रस्ता दिलेला आहे याबाबतची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कुक्कडगाव, चव्हाणवाडी, खुंड्रस या शिवारातील सिंदफणा नदीपात्रातून गेल्या काही दिवसांपासून वाळुचा बेसुमार उपसा होत आहे. वाळू माफिया दिवसाढवळ्या जेसीबीने वाळुचा उपसा करत आहेत. काल जेसीबी चालक आणि ट्रॅक्टर चालक वाळू उपसण्यावरून वादावादी झाली त्यातूनच हाणामारी झाली. या प्रकरणाची महसूल आणि पोलिस प्रशासनाने घेतली. पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले होते. साठवून ठेवलेली २०० ब्रास वाळू महसूल विभागाने सील केली तर यापुर्वी जी पंधरा ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती ती वाळू जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणून टाकली आहे. येथील काही शेतकर्यांनी वाळू माफियांना आपल्या शेतातून रस्ता उपलब्ध करून दिलेला आहे. या प्रकरणाची चाकैशी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.