2018 साली खरेदी केलेल्या स्वस्तीक कलेक्शनचे बील अदा केल्यानंतरही पुन्हा बोगस बील काढण्याचा प्रताप
तत्कालीन लेखापाल अन् मुख्याधिकार्यांच्या संगनमतातून चेकही तयार
बीड (रिपोर्टर) प्रशासक असलेल्या बीडच्या नगरपालिकेमध्ये अधिकारी, कर्मचार्यांचा सावळा गोंधळ सुरू असल्याचे चित्र अनेकदा दिसून येत असतानाच आता मुख्याधिकारी आणि तत्कालीन लेखापालाच्या संगनमतातून 2018 साली सफाई कामगार, कर्मचार्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या कपड्याचे बील पुन्हा उचलण्याचे कारस्थान सुरू असून 2018 च्या 26 मार्च रोजी जे बील काढण्यात आले होते तेच बील त्याच रकमेचे पुन्हा एकदा काढण्यासाठी तत्कालीन लेखापाल आणि मुख्याधिकारी यांच्यात तडजोड झाल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात येत असून ही रक्कम थोडीथोडकी नसून 16 लाखांच्या वर असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. स्वस्तीक कलेक्शनच्या नावे देयके तयार झाल्याचेही सांगण्यात येते.
याबाबत अधिक असे की, बीड नगरपालिकेने 2018 साली सफाई कामगार कर्मचार्यांच्या पोशाखाकरिता बीड येथील स्वस्तिक कलेक्शनमधून मोठ्या प्रमाणावर कपडा खरेदी केला होता. त्या कपड्याचे स्वस्तीक कलेक्शन याला बीलही अदा करण्यात आले होते. बील प्र.क्र. 1302 (5 लाख रुपये), 1303 (5 लाख रुपये), 1304 (3 लाख 19 हजार 986 रु.), 1305 (3 लाख 60 हजार 363 रु.) चे धनादेश 30 मार्च 2018 रोजी संबंधित स्वस्तीक कलेक्शनला बीड नगरपालिकेमार्फत देण्यात आले होते. मात्र आता पुन्हा बीड नगरपालिकेचे तत्कालीन लेखापाल दुसर्या वेळेस याच पद्धतीने स्वस्तीक कलेक्शनचे दहा लाख रुपयांचे बील तयार करून मुख्याधिकार्यांच्या संगनमतातून त्याचे चेक तयार केले आहेत. संबंधित स्वस्तीक कलेक्शनला 10 लाखांचे बील देण्याहेतू हा बोगस कारनामा सुरू आहे. 2018 च्या खरेदी केलेल्या कपड्यावर नगरपालिकेने पैसे दिल्यानंतरही पुन्हा 10 लाख रुपयांचा घपला करण्याची तयारी सुरू असून सदरचे प्रकरण हे अत्यंत गंभीर आणि बीड शहरवासियांचा पैसा घशात घालणारा आहे. या प्रकरणी विद्यमान लेखापाल यांनी सही करण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येते. एवढेच नव्हेतर विद्यमान लेखापाल यांनी थेट मुख्याधिकार्यांना ‘तुम्ही यावर सही केली, तरी मला लिखित स्वरुपात आदेश हवा’, असेही म्हटल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. बीड नगरपालिकेत सध्या प्रशासक असून तत्कालीन लेखापाल हे बोगस बिले काढण्यासाठी मुख्याधिकार्यांशी संगनमत करून जास्तीत जास्त भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र यावरून दिसून येते. 2018 सालच्या खरेदीत पैसे दिल्यानंतरही बीड नगरपालिकेकडून पुन्हा त्यावरच पैसे उचलण्यासाठी संबंधित दुकानदारालाही तत्कालीन लेखापालाने हाताशी धरल्याचेही सांगण्यात येते. तयार झालेले चेक हे बोगस असल्याचे उघड आहे. सदरचे वृत्त प्रकाशीत झाल्यानंतर तरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि तत्कालीन लेखापाल हे यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतील, परंतु जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित चेक हे नेमके कशासाठी तयार करण्यात आले? संबंधित दुकानदाराला कशाचे पैसे द्यायचे होते? यासह अन्य प्रश्न विचारले तर दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईल.