औरंगाबाद (रिपोर्टर) शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हिना कैसार अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी दोन्ही मुलींची नावे आहेत. अब्दुल सत्तार यांनी याबाबत एक चित्रफीत जाहीर करून हा नाहक बदनाम करण्याचा प्रकार असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली.
आरोग्य सेवक भरती प्रकरणचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू असतानाच दुसरीकडे टीईटी परीक्षेत देखील घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. तसेच जे परीक्षा देणारे विद्यार्थी या प्रकरणात दोषी आढळले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. परीक्षेत गैरप्रकार केलेल्या संबंधित उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. मात्र यामध्ये आता आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे टीईटी घोटाळ्यात राजकीय पुढार्यांचा हस्तक्षेप असल्याचे उघड झाले आहे.
अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण!
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाला असून त्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं समोर येत आहे. सत्ताधारी शिंदे गटातील एका आमदाराचं नाव भ्रष्टाचार प्रकरणात समोर आल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा सुरू झालेली असताना खुद्द अब्दुल सत्तार यांनीच यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करतानाच जर आपल्या कुटुंबातील कुणी दोषी असेल, तर ते गुन्हेगार आहेत, असं देखील अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.माझी बदनामी करण्याचा प्रयत्न
अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हा सगळा आपली बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. मला व्हॉट्सअपवर अशा प्रकारचा मेसेज दिसल्यानंतर मी स्वत: त्याचं स्पष्टीकरण दिलं. कुणीतरी चुकीच्या माहितीच्या आधारे माझी बदनामी करत आहे. त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.